व्हजाइनल वॉशपासून डिस्चार्जपर्यंत… दूर करा महिलांच्या पर्सनल हायजीनबाबतचे ‘हे’ गैरसमज
vaginal wash to discharge पर्सनल हायजीन आणि खासगी आरोग्याबाबत महिलांमध्ये अनेक गैरसमज आजही प्रचलित आहेत.
vaginal wash to discharge… dispel these misconceptions about women’s personal hygiene : पर्सनल हायजीन आणि खासगी आरोग्याबाबत महिलांमध्ये अनेक गैरसमज आजही प्रचलित आहेत. अनेक मुलींना लहानपणापासूनच सांगितले जाते की, जर व्हजायनल डिस्चार्ज होत असेल, हलका वास येत असेल किंवा ओलसरपणा जाणवत असेल, तर ते अस्वच्छतेचे किंवा आजाराचे लक्षण आहे. त्यामुळे अनेक महिलांच्या मनात भीती आणि संकोच निर्माण होतो. परिणामी त्या वारंवार इंटिमेट वॉश, सुगंधी प्रोडक्ट्स किंवा जास्त साफसफाई करू लागतात. मात्र, तज्ज्ञांच्या मते प्रत्येक डिस्चार्ज किंवा हलका वास हा आजाराचे लक्षण नसतो.
अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेचा मृत्यू, हुंडा अन् संपत्तीवरून नवऱ्याबाबत मोठा खुलासा
महिलांच्या शरीराची रचना अशी आहे की, विशेषतः व्हजायना स्वतःला नैसर्गिकरीत्या स्वच्छ ठेवण्याची क्षमता बाळगते. शरीरातील ही प्रणाली आपोआप संतुलन राखते. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त साफसफाई करणे किंवा रासायनिक प्रोडक्ट्स वापरणे उलट नुकसानकारक ठरू शकते. म्हणून कोणती गोष्ट सामान्य आहे आणि कोणत्या वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
प्रत्येक डिस्चार्ज म्हणजे संसर्गच असतो का?
अनेक महिलांना वाटते की व्हजायनल डिस्चार्ज म्हणजे संसर्ग. पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. डॉक्टरांच्या मते, सामान्य डिस्चार्ज हा शरीराचा नैसर्गिक भाग आहे. तो व्हजायनाला ओलावा देतो, मृत पेशी बाहेर टाकतो, चांगल्या बॅक्टेरियांचे संतुलन राखतो आणि संसर्गापासून संरक्षण करतो. मासिक पाळी, हार्मोनल बदल, ताणतणाव, आहार आणि वय यानुसार डिस्चार्जचा रंग व प्रमाण बदलू शकतो. ओव्ह्युलेशनच्या काळात डिस्चार्ज जास्त होणेही सामान्य मानले जाते.
कधी सावध व्हावे?
जर डिस्चार्जसोबत काही वेगळी लक्षणे दिसत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. जसे की तीव्र दुर्गंधी, पिवळा, हिरवा किंवा राखाडी रंगाचा डिस्चार्ज, खाज, जळजळ, लघवी करताना वेदना किंवा खासगी भागात सूज. ही लक्षणे संसर्गाची चिन्हे असू शकतात.
सुगंधी इंटिमेट वॉश खरोखर सुरक्षित आहेत का?
आज बाजारात अनेक प्रकारचे इंटिमेट वॉश उपलब्ध आहेत. जाहिरातींमुळे महिलांना वाटते की हे वापरल्याशिवाय स्वच्छता पूर्ण होत नाही. पण डॉक्टर सांगतात की, व्हजायनामध्ये नैसर्गिकरीत्या लॅक्टोबॅसिलस नावाचे चांगले बॅक्टेरिया असतात. हे बॅक्टेरिया संसर्गापासून संरक्षण करतात. वारंवार सुगंधी किंवा अँटीबॅक्टेरियल वॉश वापरल्याने हे संतुलन बिघडू शकते. त्यामुळे ड्रायनेस, जळजळ आणि संसर्गाचा धोका वाढू शकतो.
योग्य स्वच्छतेचा मार्ग कोणता?
डॉक्टरांच्या मते, व्हजायनाला आतून स्वच्छ करण्याची गरज नसते. ती स्वतः स्वच्छ राहते. फक्त बाहेरील भाग म्हणजे वल्वा कोमट पाण्याने किंवा अतिशय सौम्य, सुगंध नसलेल्या साबणाने स्वच्छ करणे पुरेसे असते.
अति साफसफाईही ठरू शकते धोकादायक
अनेक महिलांना वाटते की जास्त वेळा साफसफाई केल्याने आरोग्य चांगले राहील. पण प्रत्यक्षात यामुळे शरीराचा नैसर्गिक समतोल बिघडतो. चांगले बॅक्टेरिया नष्ट होतात, त्वचा कोरडी पडते, खाज आणि रॅशेस होतात आणि वारंवार संसर्ग होण्याची शक्यता वाढते.
इंटिमेट हेल्थसाठी सोप्या सवयी
चांगल्या खासगी आरोग्यासाठी महागडी उत्पादने नव्हे, तर योग्य सवयी महत्त्वाच्या आहेत. कापसाचे अंतर्वस्त्र वापरणे, खूप टाइट कपडे टाळणे, मासिक पाळीदरम्यान पॅड वेळेवर बदलणे, गरज नसताना अँटीबायोटिक्स न घेणे, पुरेसे पाणी पिणे आणि संतुलित आहार घेणे या साध्या गोष्टी उपयुक्त ठरतात. कोणतेही असामान्य लक्षण दिसल्यास ते दुर्लक्ष करू नये. महिलांनी आपल्या शरीरातील नैसर्गिक बदल समजून घेतले, तर अनावश्यक भीती कमी होईल आणि आत्मविश्वासही वाढेल.