महागाईचा सलून व्यवसायावर मोठा परिणाम; राज्यभर सलून सेवांच्या दरात 20 टक्क्यांची वाढ
व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी आणि कारागिरांचा उदरनिर्वाह चालू ठेवण्यासाठी ही दरवाढ अपरिहार्य असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे.
20 percent increase in prices of salon services : महागाईचा फटका आता केवळ घरगुती बजेटपूरात मर्यादित राहिलेला नाही, तर तो थेट सलून व्यवसायावर देखील पडू लागला आहे. वाढते इंधन दर, महाग झालेली सौंदर्यप्रसाधने, वाढलेले वीजबिल, दुकानभाडे आणि इतर व्यावसायिक खर्च यामुळे महाराष्ट्र नाभिक महामंडळाने सल्लून सेवांच्या दरात तब्ब्ल 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे ही दरवाढ 6 जूनपासून राज्यभरात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आता केस कापणे, दाढी करणे, हेअर कलर, फेशियल, हेअर ट्रीटमेंट, ब्रायडल मेकअप आणि ग्रूम मेकअपसारख्या सर्व सेवांसाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या मते, गेल्या काही वर्षांपूर्वी सलून व्यावसायिक अतिशय कमी नफ्यावर ग्राहकांना सेवा देत होते. मात्र, वाढत्या महागाईमुळे व्यवसाय चालवण्याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शॅम्पू, हेअर कलर, जेल, वॅक्स यांसारख्या दैनंदिन वापरातील उत्पादनांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्याचबरोबर दुकानांचे वाढते भाडे, व्यावसायिक वीजबिले, स्थानिक कर आणि व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील सलून चालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी आणि कारागिरांचा उदरनिर्वाह चालू ठेवण्यासाठी ही दरवाढ अपरिहार्य असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, सलून सेवांच्या सध्याच्या दरांमध्ये मोठी तफावत पाहायला मिळते. दाढीसाठी प्रीमियम सल्लूनमध्ये 200 ते 500 रुपये आकारले जातात, तर एसी सलूनमध्ये 100 ते 200 रुपये आणि ग्रामीण भागात 50 ते 70 रुपये खर्च येतो. कटिंगसाठी प्रीमियम सलूनमध्ये 500 ते 100 रुपये, एसी सलूनमध्ये 150 ते 350 रुपये आणि ग्रामीण भागात 80 ते 100 रुपये मोजावे लागतात.
लंडनमध्ये सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या कार्यक्रमात गदारोळ, भारतीय उच्चायोगाने सुनावले खडे बोल
हेअर कलरची प्रीमियम सलूनमध्ये 700 ते 1000 रुपये खर्च येतो, तर एसी सलूनमध्ये हा खर्च 300 ते 500 रुपयांपर्यंत असतो. ग्रामीण भागात ही सेवा 100 ते 200 रुपयांत उपलब्ध आहे. फेशियलसाठी प्रीमियम सलूनमध्ये 2000 ते 3000 रुपये, एसी सलूनमध्ये 500 ते 1500 रुपये, तर ग्रामीण भागात 200 ते 500 रुपये खर्च करावे लागतात.
हेअर ट्रीटमेंटसाठी प्रीमियम सलूनमध्ये 3000 ते 5000 रुपये, तर एसी सलूनमध्ये 1500 ते 3000 रुपये आकारले जातात. ब्रायडल मेकअपचा विचार केला तर प्रीमियम सलूनमध्ये यासाठी तब्बल 7000 ते 10 हजार रुपये मोजावे लागतात. एसी सलूनमध्ये हा खर्च 3000 ते 7000 रुपये असून ग्रामीण भागात 1500 ते 3000 रुपयांमध्ये ब्रायडल मेकअप केला जातो. तर ग्रूम मेकअपसाठी प्रीमियम सलूनमध्ये 2000 ते 4000 रुपये, एसी सलूनमध्ये 1000 ते 3000 रुपये आणि ग्रामीण भागात 500 ते 1500 रुपये खर्च येतो.
महागाईच्या वाढत्या दबावात सलून व्यवसाय जिवंत ठेवण्यासाठी ही 20 टक्के दरवाढ आवश्यक असल्याचे नाभिक महामंडळाचे म्हणणे आहे. मात्र या निर्णयामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक भार पडणार हेही तितकेच खरे आहे. त्यामुळे महागाईचा आणखी एक फटका आता सलूनच्या खुर्चीवर बसणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला सहन करावा लागणार आहे.