कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर; 6 जुलैपर्यंत राज्यभर मुसळधार पावसाची शक्यता

मध्य महाराष्ट्रातही बहुतांश भागांत चांगल्या पावसाचा अंदाज असून घाटमाथ्यावरील भागांत पावसाचा जोर अधिक राहू शकतो.

  • Written By: Published:
Untitled Design 66

Possibility of heavy rainfall across the state : जून महिना जवळपास कोरडाच गेल्यानंतर जुलैच्या सुरुवातीलाच पावसाने महाराष्ट्रात दमदार पुनरागमन केले आहे. कोकण, विदर्भ, मराठवाड्यातील काही भाग, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशात पावसाचा जोर वाढला असून पुढील काही दिवस राज्यभर पावसाचा प्रभाव कायम राहणार आहे. महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीदरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. तसेच मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातून द्रोणीय रेषा पसरल्याने वातावरण पावसासाठी अनुकूल बनले आहे. यामुळे राज्यातील अनेक भागांत 6 जुलैपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

गुरुवारी, 2 जुलै रोजी पालघर आणि पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण किनारपट्टीवर अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातही बहुतांश भागांत चांगल्या पावसाचा अंदाज असून घाटमाथ्यावरील भागांत पावसाचा जोर अधिक राहू शकतो.

189 धावांचा मजबूत टप्पा गाठूनही भारताच्या हाती निराशा; सततच्या पावसामुळे इंग्लंडविरुद्धचा पहिला टी-20 सामना रद्द

विदर्भात व्यापक स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मराठवाड्यात 2 आणि 3 जुलै रोजी पावसाचा जोर वाढेल, तर त्यानंतर तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. 2 ते 4 जुलैदरम्यान कोकणातील काही भागांत अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच 2 आणि 3 जुलै रोजी मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळू शकतो. 4 ते 6 जुलैदरम्यान मध्य महाराष्ट्रातील काही भागांतही अतिवृष्टीचा धोका कायम राहणार आहे. याशिवाय 4 जुलैपर्यंत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये थायरॉईडचा त्रास अधिक का आढळतो? जाणून घ्या कारणं

पुढील तीन दिवसांसाठी हवामान विभागाने विशेष इशारे दिले आहेत. 3 जुलै रोजी रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरील भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बुलडाणा, अकोला आणि अमरावती जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 4 जुलै रोजी रायगड, ठाणे आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरील भागांसाठी रेड अलर्ट कायम राहणार आहे. तर मुंबई, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

5 जुलै रोजी संपूर्ण कोकण किनारपट्टीसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवण्यात आला आहे. एकूणच, जुलैच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात पावसाची जोरदार हजेरी लागणार असून विशेषतः कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातील नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

follow us