चाकणच्या ट्रॅफिक कोंडीवर उद्योगमंत्री सामंतांचा ‘ॲक्शन प्लॅन’; बॉटलनेकची केली पाहणी
शेतकरी बोत्रे यांची बाजू ऐकून घेत सामंत यांनी त्यांना शांत करत सर्व संबंधित कागदपत्रांसह स्वतंत्र बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
चाकण एमआयडीसी परिसरातील (Chakan) वाहतूक कोंडी, खड्डेमय रस्ते आणि वाढत्या अपघातांच्या समस्येने उद्योगविश्वासह स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून, या परिस्थितीचा फटका तब्बल 20 लघुउद्योगांना बसला आहे. वाढत्या अडचणींमुळे काही उद्योग बंद करण्याच्या प्रक्रियेत असल्याची माहिती समोर आल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रविवारी चाकण एमआयडीसीची पाहणी केली. मात्र, या दौऱ्यात प्रशासनाच्या कारवाईविरोधात एका बाधित शेतकऱ्याने थेट मंत्र्यांसमोर संताप व्यक्त केल्याने दौऱ्याला वेगळेच वळण मिळाले.
पाहणीदरम्यान दत्तात्रय बोत्रे या बाधित शेतकऱ्याने उदय सामंत यांची भेट घेत आपल्या जमिनी आणि घरासंदर्भातील प्रश्न मांडला. कारवाईच्या नावाखाली दडपशाही होत असल्याचा आरोप करत त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. आपल्या हक्काच्या घरावर गदा येत असल्याचे सांगत बोत्रे यांनी टोकाचे पाऊल उचलण्याचा इशारा दिला. शेतकऱ्याचा आक्रमक पवित्रा पाहून उपस्थित अधिकारीही काही काळ गोंधळून गेले.
जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली चाकणच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी समिती स्थापन
दरम्यान, चाकण एमआयडीसीतील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि वाहतूक व्यवस्थेवर उद्योगमंत्र्यांनीही नाराजी व्यक्त केली. रस्त्यांच्या कामात निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याचे संकेत देत, खड्डे भरण्यासाठी झालेला खर्च वाया गेला असल्यास ठेकेदाराला देयक अदा केले जाणार नाही, अशी भूमिका सामंत यांनी स्पष्ट केली. उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
चाकणमधील प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून, उद्योगांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी स्वतंत्र तक्रार निवारण कक्षही सुरू करण्यात येणार आहे. शेतकरी बोत्रे यांची बाजू ऐकून घेत सामंत यांनी त्यांना शांत करत सर्व संबंधित कागदपत्रांसह स्वतंत्र बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन केले. संबंधित प्रकरणाची माहिती घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
दरम्यान, उद्योगमंत्र्यांचा पाहणी दौरा अवघ्या अर्ध्या तासात आटोपल्याबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर सामंत यांनी स्पष्टीकरण दिले. चाकण एमआयडीसी असोसिएशनच्या प्रतिनिधींनी दाखवलेल्या प्रमुख ‘बॉटलनेक’ ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली असून, उर्वरित समस्या आणि उपाययोजनांवर बैठकीत सविस्तर सादरीकरण पाहिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे चाकणच्या वाहतूक, रस्ते आणि जमीनविषयक प्रश्नांवर आता शासनाच्या पुढील निर्णयांकडे उद्योगविश्व आणि स्थानिकांचे लक्ष लागले आहे.
अनधिकृत पार्किंग आणि ट्रॅफिक बाबत पोलीस कारवाई करतील असेही सामंत म्हणाले. तीन-तीन मीटर रस्ते वाढवले जातील. सब स्टेशन वाढवले जातील. 59 कोटींचा रस्ता PWA कडे आहे, तिथं रात्रीत खड्डे भरले गेलेत. ट्रक टर्मिनल केलाय, MIDC ने हॉस्पिटल ला जागा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती देखील सामंत यांनी दिली.
पाणी पुरवठा बाबत संबंधित मंत्री स्वतः इथं येऊन बैठक घेतील, त्याबाबत ही तोडगा काढला जाईल. दर शुक्रवारी पुणे जिल्हाधिकारी दरबार करतील, म्हणजे बैठक घेऊन त्या-त्यावेळी तोडगा काढला जाईल. मी सुद्धा प्रत्येकवेळी येईन किंवा बैठक घेईन असे सामंत म्हणाले. दरम्यान, आजपासून दहा महिन्यात उद्योजकांना अपेक्षित सर्व कामं पूर्ण करण्याची डेडलाईन ठरविण्यात आली असल्याचे उदय सामंत यावेळी म्हणाले. तसेच मी प्रत्येक दोन महिन्याला बैठक घेणार, आढावा घेणार असल्याचेही सामंत म्हणाले.