उद्योगमंत्री सामंतांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; दोन तासांच्या बैठकीत कोणती चर्चा?
Uday Samant meet Manoj Jarange Patil : राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली आहे. या घडामोडीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची सोमवारी रात्री आंतरवाली सराटीत जाऊन भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांत जवळपास दोन तास चर्चा झाली. या चर्चेत कोणते मुद्दे होते याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, या भेटी दरम्यान मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे देखील उपस्थित होते अशी माहिती मिळाली आहे.
मोठी बातमी! आज महाराष्ट्र-झारखंड निवडणुकीची घोषणा; दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
विधानसभा निवडणुकांची घोषणा (Maharashtra Elections 2024) आजच होणार आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. या निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांची भूमिका काय राहणार याची उत्सुकता राजकीय पक्षांना आहे. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर भूमिका मांडू असे जरांगे पाटील यांनी नारायण गडावरील दसरा मेळाव्यात स्पष्ट केले होते. मात्र आचारसंहिता जाहीर होण्याआधीच सोमवारी रात्री उद्योगमंत्री उदय सामंत मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आंतरवाली सराटीत दाखल झाले.
येथे आल्यानंतर मंत्री सामंत यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांत जवळपास दोन तास चर्चा झाली. ही चर्चा कोणत्या मुद्द्यांवर झाली याची माहिती मात्र समजू शकलेली नाही. त्यामुळे उद्योगमंत्री मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी का आले असावेत असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, उदय सामंत घनसावंगी मतदारसंघात हिकमत उढाण यांच्या पक्षप्रवेशासाठी आले होते. याच दिवशी मध्यरात्री त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे देखील उपस्थित होते.
Video: आचारसंहितेनंतर मुख्य भूमिका जाहीर करणार तेव्हा मी सांगेल ते ऐकायचं; जरांगेंनी शड्डू ठोकला
आचारसंहितेनंतर भूमिका जाहीर करणार : जरांगे पाटील
बीड जिल्ह्यातील नारायणगड येते झालेल्या दसरा मेळाव्यात बोलताना मनोज जरांगे म्हणाले होते, की मागच्या १४ महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. पण सरकारने एकही मागणी मान्य केलेली नाही. आता सरकारला सुट्टी नाही. सरकारने आचारसंहिता लागण्यापूर्वी आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा. आता आचारसंहिता लागेपर्यंत वाट पाहायची. मात्र, सरकारने काही दगाफटका करण्याचा प्रयत्न केला तर, सरकारच्या नाकावर टिच्चून सरकारला उलटपालटं केल्याशिवाय मागे हटणार नाही. तसंच आचारसंहिता लागू झाल्यानंतर मुख्य भूमिका जाहीर करेन. तेव्हा मी जे सांगेन ते तुम्ही ऐकायचं, असं आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्यासाठी उपस्थितांना केलं होतं.