…तर मुंबईत ठाकरेंचाच महापौर होऊ शकतो; आरक्षण सोडतीपूर्वी धाकधूक वाढवली

येत्या 22 जानेवारीला मुंबई महापौर आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. आजच याबाबतची माहिती नगरविकास मंत्रालयाने दिली.

  • Written By: Published:
News Photo   2026 01 19T224918.412

मुंबईचा महापौर कोण होणार याची उत्सुकता आजही कायम आहे आहे. (BMC) मुंबई मनपाच्या निकालात 89 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर उद्धव ठाकरेंची शिवसेना 65 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. महायुतीतील एकनाथ शिंदेंची शिवसेना 29 जागांसह तिसऱ्या स्थानावर गेली आहे. निकालानंतरएकनाथ शिंदेंनी आपल्या सर्व नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवलं आहे. महापौरांच्या निवडणुकीआधी फोडाफोडी होण्याची भीती आहे. त्यामुळे सर्व नेते आपआपल्या पक्षातील नगरसेवकांना सांभाळण्यात गुंतले आहेत.

आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जर “देवाची इच्छा असेल तर महापौर आपला असेल” असं वक्तव्य केलं होतं. एकीकडे ठाकरेंचं वक्तव्य, दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवल्याने, राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. तर देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, देवाच्या मनात म्हणजे मी नव्हे, देवानेच ठरवलंय, महापौर महायुतीचाच होईल. असं असलं तरी अद्याप महापौर आरक्षण सोडत जाहीर झालेली नाही. त्यामुळे महापौर आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर मोठी उलथापालथ होऊ शकते.

येत्या 22 जानेवारीला महापौर आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. आजच याबाबतची माहिती नगरविकास मंत्रालयाने दिली. सर्व 29 महानगरपालिकामधील महापौरपदाच्या आरक्षणाची 22 जानेवारीला सकाळी 11 वाजता काढली जाणार आहे. त्यावेळी कोणत्या प्रवर्गाचा महापौर मुंबईच्या खुर्चीत विराजमान होणार हे ठरणार आहे.

ठाकरेंकडे हुकूमाचे एक्के

महापौरपदाचे आरक्षण अद्याप जाहीर झालेले नसले तरी सध्याच्या घडीला ठाकरेंकडे दोन हुकूमाचे एक्के असल्याचं चित्र आहे. कारण निवडणुकीपूर्वी नगरसेवकांसाठी जाहीर झालेल्या आरक्षणामध्ये 2 जागा अनुसूचित जमाती अर्थात ST साठी राखीव आहेत. प्रभाग 53 आणि प्रभाग 121 हे दोन प्रभाग अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव होते. या दोन मतदारसंघात सर्वपक्षांनी उमेदवार दिले. पण दोन्ही ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचेच उमेदवार विजयी झाले.

अशा परिस्थितीत जर 22 जानेवारीला महापौरपदासाठी जी आरक्षण सोडत निघणार आहे, त्यावेळी महापौरपद जर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव जाहीर झालं तर ठाकरेंना लॉटरी लागू शकते. त्यामुळे जसं उद्धव ठाकरे म्हणाले, त्याप्रमाणे जर “देवाची इच्छा असेल तर महापौर ठाकरेंचा होऊ शकतो.

‘ते’ दोन उमेदवार कोण?

प्रभाग 53 आणि प्रभाग 121 हे दोन प्रभाग अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव होते. या दोन्ही प्रभागात ठाकरेंचे उमेदवार विजयी झाले. प्रभाग 53 मधून जितेंद्र वळवी यांनी बाजी मारली, त्यांनी एकनाथ शिंदेंच्या सेनेचे अशोक खांडवेंचा पराभव केला. तर प्रभाग 121 मधून प्रियदर्शनी ठाकरे यांचा विजय झाला. प्रियदर्शनी ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या उदमेवार प्रतिमा खोपडे यांचा पराभव केला.

मुंबई महापालिकेचा अंतिम निकाल
भाजप – 89

शिवसेना ठाकरे गट – 65

शिवसेना – 29

काँग्रेस – 24

मनसे – 6

एमआयएम- 8

एनसीपी – 3

एसपी – 2

एनसीपी शप – 1
————–
एकूण- 227

Tags

follow us