धक्कादायक! इन्स्टा स्टोरी ठेवल्यावरून झाला वाद, सख्ख्या भावांनी १७ वर्षाच्या मुलाची केली हत्या
Murder in Hinganghat for posting an Instagram story : हिंगणघाट भयंकर आणि तितकाच (Murder ) धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे इन्स्टाग्रामला ठेवलेल्या स्टोरीवरून झालेल्या वादानंतर तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना घडलीय. वर्ध्यात हिंगणघाट इथं घडलेल्या या घटनेत हिमांशू चिमणे याची हत्या करण्यात आलीय. या प्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. तर एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणघाट तालुक्यातल्या पिंपळगाव इथल्या १७ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आलाय. हिमांशू किशोर चिमणे असं तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी मानव धनराज जुगनाके आणि अनिकेत धनराज जुगनाके यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दीड महिन्यापूर्वी हिमांशू आणि मानव यांनी इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली होती. त्यात लाइक्स कमी जास्त मिळाल्या यावरून दोघांमध्ये वाद झाला होता.
इन्स्टा स्टोरीवरून सुरू झालेला हिमांशू आणि मानव यांच्यातला वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. त्यानंतरही त्यांच्यात तूतू मैमै सुरू होतं. तर काही दिवसांनी हिमांशूने पुन्हा बाप तो बाप रहेगा अशी पोस्ट केली. या पोस्टवरून वाद आणखी पेटला. यावेळी वाद मिटवण्यासाठी हिमांशू स्वत: मानवच्या घरी गेला. पण तिथे पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. या वादात हिमांशूने मानवला चापट मारली होती.
हिमांशू आणि मानव यांच्यातला वाद मिटण्याऐवजी पुन्हा चिघळला. दोघांमध्ये मध्यस्थीसाठी मानवचा भाऊ पुढे आला. हिमांशूने त्यावेळी धारदार शस्त्राने मानववर वार केले. तेव्हा मानवच्या भावाने पुढे येत त्याला रोखलं. मानव आणि त्याच्या भावाने प्रतिहल्ला करत हिमांशूवर वार केले. यात हिमांशूचा मृत्यू झाला. तर आरोपी अनिकेत जुगनाके जखमी झाला आहे.