तांत्रिक बिघाडामुळे राज्यातील डिजिटल सेवा विस्कळीत; ‘आपले सरकार’ पोर्टल पुर्वव्रत करण्याचे काम अंतिम टप्प्यात

आपले सरकार वेब पोर्टल गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक अडचणींमुळे बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

Untitled Design 62

‘Aaple Sarkar’ portal disrupted : राज्यातील नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे आपले सरकार वेब पोर्टल गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक अडचणींमुळे बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मात्र, हे पोर्टल लवकरच पूर्ण क्षमतेने पुन्हा सुरू करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे इलेकट्रोनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे.

27 एप्रिलच्या रात्रीपासून अचानक बंद पडलेल्या या वेब पोर्टलमुळे जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, शिष्यवृत्ती अर्ज, तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठी अर्ज प्रक्रिया ठप्प झाली आहे. दररोज लाखो नागरिक या पोर्टलचा वापर करत असल्याने राज्यभरात विद्यार्थ्यांपासून नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांपर्यंत आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण झाले आहेत. विशेषतः शैक्षणिक आणि शासकीय कामांसाठी मुदती जवळ आलेल्या अर्जदारांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत राज्य शासनाने तातडीने उच्चस्तरीय पावले उचलली आहेत. मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीस विभागातील वरिष्ठ अधिकारी, तसेच महाआयटीचे पदाधिकारी उपस्थित होते. पोर्टल बंद पडण्यामागील नेमके कारण शोधून ते कायमस्वरूपी दूर करण्यासाठी विशेष तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली आहे.

1 मेपासून महागाईचा भडका; व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल 993 रुपयांची वाढ

या समितीत आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ, अभियंते आणि तंत्रज्ञान प्रमुखांचा समावेश असून, ते युद्धपातळीवर काम करत आहेत. प्राथमिक तपासणीत काही तांत्रिक त्रुटी आणि प्रणालीतील अडथळे असून, त्यावर तातडीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. यासोबतच भविष्यात अशा प्रकारच्या अडचणी पुन्हा उद्भवू नयेत यासाठी संपूर्ण प्रणाली अधिक सक्षम, जलद आणि सुरक्षित करण्यावर विशेष भर दिला जात आहे.

दरम्यान, पोर्टल बंद असल्यामुळे नागरिकांनी सेवा केंद्रांद्वारे पर्यायी मार्गांचा वापर करावा, तसेच संबंधित विभागांशी संपर्कात राहावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दुरुस्तीचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून ‘आपले सरकार’ वेबपोर्टल लवकरच पूर्ववत सुरू होईल, असा विश्वास शासनाने व्यक्त केला आहे. नागरिकांची गैरसोय कमी करण्यासाठी सर्व यंत्रणा समन्वयाने काम करत असून, येत्या काही दिवसांत सेवा सुरळीत होण्याची शक्यता आहे.

follow us