1 मेपासून महागाईचा भडका; व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल 993 रुपयांची वाढ

महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 993 रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे.

Untitled Design 61

Increase in the price of commercial gas cylinders : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे मतदान संपताच सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची ठरणारी एक मोठी आर्थिक घडामोड समोर आली आहे. 1 मे 2026, म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 993 रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही वाढ केवळ 19 किलो वजनाच्या व्यावसायिक सिलिंडरपुरती मर्यादित असून, 14.2 किलो घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

या दरवाढीचा थेट परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे आणि खानावळींवर होणार असून, येत्या काळात बाहेरचे जेवण महागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आधीच वाढत्या खर्चाचा सामना करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांसाठी हा मोठा आर्थिक धक्का मानला जात आहे. आम्ही व्यवसाय करायचा कसा? असा संतप्त सवाल आता व्यावसायिकांकडून उपस्थित केला जात आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडून जाहीर करण्यात आलेल्या नव्या दरांनुसार, देशातील प्रमुख शहरांमध्ये ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.

प्रतीक्षा संपली! 12 वीचा निकाल 2 मे ला; विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार

राजधानी दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत थेट 993 रुपयांची वाढ झाली असून, एक सिलिंडर आता 2,078.50 रुपयांवरून 3,071.50 रुपयांवर पोहोचला आहे. इतर शहरांतील दर पाहता, कोलकात्यात सर्वाधिक 994 रुपयांची वाढ नोंदवली गेली असून, येथे सिलिंडरची किंमत आता 3,202 रुपये झाली आहे. मुंबई, पुणे आणि नाशिक या शहरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरचा दर 3,024 रुपयांवर गेला आहे. तर चेन्नई येथे हा दर 3,237 रुपयांवर पोहोचला आहे.

दरवाढीमुळे आधीच व्यावसायिक गॅसचा तुटवडा भासत असताना, आता वाढलेल्या किमतींमुळे लहान आणि मध्यम व्यवसायांना मोठा फटका बसणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच आलेल्या या निर्णयामुळे व्यावसायिक एलपीजी ग्राहकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

follow us