राज्यातील सहकार क्षेत्रात मोठी उलथापालथ, अहिल्यानगरसह 13 जिल्हा सहकारी बँकांवर प्रशासक
13 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे संचालक मंडळ बरखास्त करून त्या ठिकाणी प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
Administrators at 13 district cooperative banks : महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडवणार एक महत्वाची घडामोड समोर आली आहे. बँकिंग कायदा अधिनियम 2025 अंतर्गत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून, मुदत संपत आलेल्या राज्यातील सुमारे 13 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे संचालक मंडळ बरखास्त करून त्या ठिकाणी प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सहकार क्षेत्रातील राजकीय आणि आर्थिक समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत.
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर विशेष लेख परीक्षक गौतम निकाळजे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ठाणे जिल्हा सहकारी बँकेचा कारभार जिल्हा उपनिबंधकांकडे सोपवण्यात आला आहे. राज्यातील ठाणे, नांदेड, यवतमाळ, अकोला, वाशीम, छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा, धुळे, जळगाव, जालना, सोलापूर आणि बीड अशा अनेक महत्वाच्या जिल्हा बँकांवर प्रशासक नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे.
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची मुदत फेब्रुवारी महिन्यात संपली होती. त्यामुळे बँकेची निवडणूक लवकरच जाहीर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. इच्छुक उमेदवार आणि राजकीय गट या निवडणुकीसाठी सज्ज झाले होते. मात्र, प्रशासक नेमल्यामुळे ही निवडणूक आता लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना होणार रद्द; मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा
या बँकेवर सध्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीचे वर्चस्व आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यातील राजकीय चुरस नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. पूर्वी निंबाळकर-थोरात-घुले गटाचे वर्चस्व असलेल्या या बँकेत अलीकडील काळात विखे पाटील गटाने आपली पकड मजबूत केली होती.
मागील निवडणुकीत पहिल्या टप्पयात थोरात गटाचे उदय शेळके यांना अध्यक्षपद देण्यात आले होते. त्यांच्या निधनानंतर माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी अध्यक्षपद पटकावले आणि राष्ट्रवादी व काँग्रेसला जोरदार आव्हान दिले. पुढे कर्डीले यांच्या निधनानंतर अध्यक्षपद रिक्त झाले आणि त्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या कार्यकाळाची मुदत संपल्यानंतर सहकार खात्याने प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी कार्यक्रम सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अहिल्यानुसार जिल्हा बँकेसाठी प्रारूप मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती आणि मार्चअखेर निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. आता मात्र या सर्व घडामोडींमुळे निवडणूक प्रक्रिया थांबली असून, सहकार क्षेत्रात पुढे काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.