अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध; विखे-थोरात-शिंदे-लंके यांच्यातील चर्चेत काय निर्णय होणार?
Ahilyanagar District Central Cooperative Bank Election : अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीमुळे नगर जिल्ह्याच्या राजकारणात
Ahilyanagar District Central Cooperative Bank Election : अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीमुळे नगर जिल्ह्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. या निवडणुकीसाठी अर्ज माघारीचा उद्या शेवटचा दिवस असल्याने निवडणूक बिनविरोध होणार का? याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे आज नगर जिल्ह्यात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. उद्या (21 ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने आज बिनविरोधसाठी सर्वपक्षीय बैठक पार पडली.
निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) , काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यासह विधानपरिषद सभापती राम शिंदे (Ram Shinde) , खासदार निलेश लंके आणि महायुती, काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित एकत्र आले होते. मागच्या बैठकीत राम शिंदेसह निलेश लंके (Nilesh Lanke) यांना आमंत्रण नसल्याने दोघांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होणार? जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होणार का? याकडे संपूर्ण नगर जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
सुरुवातीला या निवडणुकीबाबत विधानपरिषद सभापती राम शिंदे आणि खासदार निलेश लंके यांनी वेगळी भूमिका घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु होती मात्र आता दोन्ही नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आयोजित बैठकीत भाग घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.
21 संचालक पदांसाठी ही निवडणूक होत असून त्यापैकी 14 जागा तालुकानिहाय सेवा सोसायटी मतदारसंघातून आहेत. उर्वरित जागांमध्ये दोन महिला, शेतीपूरक, बिगरशेती, ओबीसी, भटक्या-विमुक्त आणि अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागांचा समावेश आहे.
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 2026 निवडणुकीचे वेळापत्रक
| टप्पा | तारीख |
|---|---|
| उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात | 28 सप्टेंबर 2026 |
| उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख | 5 ऑक्टोबर 2026 |
| उमेदवारी अर्जांची छाननी | 6 ऑक्टोबर 2026 |
| उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत | 7 ते 21 ऑक्टोबर 2026 |
| अंतिम उमेदवार यादी व निवडणूक चिन्ह वाटप | 22 ऑक्टोबर 2026 |
| मतदान | 2 नोव्हेंबर 2026 |
| मतमोजणी | 3 नोव्हेंबर 2026 |