तुझ्या बापापेक्षा माझा काका लय मोठा आहे; अजितदादांनी पठारे पिता-पुत्रांवर डागली तोफ

पुण्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत बोलताना अजित पवारांनी शरद पवारांचा संदर्भ देत विरोधकांना इशारा दिला.

  • Written By: Published:
Untitled Design (257)

Ajit Pawar took direct aim at MLA Bapu Pathare and his son : पुण्यातील प्रभाग क्रमांक 3 आणि 4 मधील उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी चंदननगर येथे जाहीर सभा घेतली. या सभेत बोलताना अजित पवारांनी शरद पवारांचा संदर्भ देत विरोधकांना इशारा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मधील एका आमदाराचं थेट नाव न घेता टीका करताना, त्याच आमदाराच्या घरातून भाजपकडून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसह इतर विरोधी उमेदवारांवरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला.

’30 वर्ष नुसत्या दाढ्या वाढवल्या का?’ असा सवाल उपस्थित करत अजित पवारांनी आमदार बापू पठारे आणि त्यांच्या पुत्रावर थेट निशाणा साधला. ‘घरात वेगवेगळी पदं, सत्ता होती; पण विकास का केला नाही? आता अचानक विकास आठवला? मग एवढे दिवस काय झोपा काढल्या की दाढ्या वाढवल्या?’ अशा शब्दांत त्यांनी टीका केली. बापू पठारे यांचे पुत्र या निवडणुकीत भाजपकडून उमेदवार असल्याच्या पार्श्वभूमीवर, विकासाच्या नावाखाली भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवण्यावरून अजित पवारांनी पठारे पिता-पुत्रांवर तोफ डागली.

‘आमच्या वाटेला कोणी जाऊ नका. गेला तर आम्हीही सोडणार नाही,’ असा इशारा देत अजित पवार म्हणाले, ‘ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी.’ पुढे ते म्हणाले, ‘जर कोणी स्वतःला फार मोठ्या बापाचा समजत असेल, तर आम्हीही मोठ्या काकाचा पुतण्या आहोत. तुझ्या बापापेक्षा माझा काका लय मोठा आहे.’ ‘इथे गंमतच झाली आहे, वडील तुतारीचे आमदार आणि मुलगा-सून भाजपचे उमेदवार. किती रे बनवाबनवी?’ असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

ती फाईल बाहेर आली असती तर हाहाकार झाला असता; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा भाजपवर थेट आरोप

2024 च्या विधानसभा निवडणुकीत वडगाव शेरी मतदारसंघातून महाविकास आघाडी (NCP-SP) कडून बापूसाहेब पठारे विजयी झाले. मात्र त्यांच्या कुटुंबातील सुरेंद्र पठारे आणि ऐश्वर्या पठारे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून पक्षाकडून उमेदवारी मिळवली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 (चंदननगर–खराडी) मधून भाजपकडून सुरेंद्र पठारे निवडणूक लढवत आहेत. याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी ‘वडील तुतारीचे आमदार, मुलगा-सून भाजपचे उमेदवार’ असा टोला लगावला.

‘इथे दादागिरी आणि दहशत सुरू आहे. संविधानाचा सर्वांनी आदर केला पाहिजे. कायद्याला मानायचं नाही, ‘कायदा म्हणजे आम्ही’ असा कारभार चालू आहे,’ अशी टीका करत अजित पवारांनी थेट नाव न घेता विरोधकांवर निशाणा साधला. ‘तुम्ही सत्ता द्या. नाही तर टँकर माफियांचं कंबरडं मोडलं नाही, तर अजित पवार नाव सांगणार नाही,’ असा इशारा देत त्यांनी गुन्हेगारीवर कठोर कारवाईचं आश्वासन दिलं. ‘मी पुण्याचा, तुम्ही पुण्याचे. लोकांना त्रास दिला तर गुन्हे दाखल करू. ऐकलं नाही तर मकोका लावू,’ असंही त्यांनी स्पष्ट केलं.

follow us