संसदेत नव्या पर्वाची सुरुवात, पण स्टाइल जुनीच; पार्थ पवारांनी जपला अजित पवारांचा गुलाबी जॅकेट लूक

पार्थ पवार यांनी शपथविधीवेळी परिधान केलेले गुलाबी जॅकेट आणि चष्मा यामुळे अनेकांना अजित पवार यांची आठवण झाली.

  • Written By: Published:
Untitled Design 54

Ajit Pawar’s pink jacket look : राज्याच्या राजकारणात आज एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली. दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेतली. नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत त्यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर दिल्लीत देशाचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते त्यांना पदाची शपथ देण्यात आली. या शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार विशेष उपस्थित होत्या.

याशिवाय पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनीही उपस्थित राहून पार्थ पवार यांना शुभेच्छा दिल्या. पार्थ पवार यांनी इंग्रजी भाषेतून शपथ घेत संसदेत आपल्या नव्या राजकीय प्रवासाची औपचारिक सुरुवात केली. शपथविधीप्रमाणेच पार्थ पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाचीही जोरदार चर्चा रंगली. त्यांनी परिधान केलेले गुलाबी जॅकेट आणि चष्मा यामुळे अनेकांना अजित पवार यांची आठवण झाली. त्यांच्या एकंदरीत लूकमध्ये अजितदादांची झलक दिसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पार्थ पवार यांचे अभिनंदन केले. त्यांनी म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेस परिवारासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. पार्थ अजित पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेत लोकसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात केली आहे. जनतेच्या विश्वासाचे प्रतिनिधित्व करताना त्यांच्या माध्यमातून तरुण नेतृत्वाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकहित, विकास आणि जनकल्याण या मुद्द्यांवर ते संसदेत प्रभावी कामगिरी करतील, अशीही त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. पार्थ पवार यांच्या या पहिल्याच संसदेतील प्रवेशामुळे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय पातळीवर अधिक बळकट होणार असल्याचे मानले जात आहे.

follow us