राहुल कलाटे फाऊंडेशनचा उपक्रम, दत्त मंदिर रोडवर 100 बकुळ वृक्षांची लागवड, वाकडच्या हरितीकरणाला चालना
अभियानाच्या पहिल्या टप्प्यात आंध्र प्रदेशातून मागविण्यात आलेल्या सुमारे 100 बकुळ वृक्षांची लागवड दत्त मंदिर रोड परिसरात करण्यात येणार आहे.
An initiative by the Rahul Kalate Foundation : विकासकामांसोबतच पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देत वाकड परिसर अधिक हिरवागार, स्वच्छ आणि सुंदर करण्याच्या उद्देशाने राहुल कलाटे फाउंडेशनच्या वतीने ‘ग्रीन दत्त मंदिर रोड’ वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. 29 सप्टेंबर रोजी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत या पर्यावरणपूरक अभियानाची सुरुवात झाली.
या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात आंध्र प्रदेशातून विशेष मागविण्यात आलेल्या सुमारे 100 बकुळ वृक्षांची लागवड दत्त मंदिर रोड परिसरात करण्यात येणार आहे. बकुळ हा देशी वृक्ष असून पुराण तसेच आयुर्वेदामध्ये या वृक्षाला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. आगामी काही दिवसांत टप्प्याटप्प्याने या परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार असून, केवळ वृक्षलागवड न करता त्यांचे संगोपन आणि संवर्धन करण्यावरही विशेष भर दिला जाणार आहे.
यावेळी बोलताना नगरसेवक राहुल कलाटे म्हणाले, “दत्त मंदिर रोडचे काम जवळपास 90 टक्के पूर्ण झाले आहे. ‘ग्रीन दत्त मंदिर रोड’च्या माध्यमातून हा परिसर अधिक हिरवागार, स्वच्छ आणि प्रसन्न करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 100 बकुळ वृक्षांची लागवड करण्यात येत असून, या वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन करण्यासाठीही विशेष नियोजन केले जाणार आहे. हा उपक्रम केवळ फाउंडेशनचा नसून नागरिकांच्या सहभागातून तो अधिक व्यापक व्हावा, यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.”
अशोक खरात प्रकरणात कोर्टाचा मोठा आदेश, आरोपींच्या वकिलांना व्हिडीओ पुरावे पाहण्याची परवानगी
दत्त मंदिर रोडच्या रुंदीकरण आणि सुशोभीकरणाच्या कामाला 2022 मध्ये सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर विविध विकासकामांच्या माध्यमातून रस्त्याचे रूप बदलण्याचे काम सुरू आहे. आता या विकासकामांना पर्यावरण संवर्धनाची जोड देत ‘ग्रीन दत्त मंदिर रोड’ उपक्रम राबविण्यात येत आहे. रस्त्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर देशी वृक्षांची लागवड झाल्याने आगामी काळात या भागाचे हरित क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. वृक्षांमुळे परिसराचे सौंदर्य वाढण्यासोबतच नागरिकांना अधिक प्रसन्न आणि नैसर्गिक वातावरण मिळावे, हा या अभियानामागील उद्देश आहे.
विकासकामांसोबत पर्यावरणाचा समतोल राखण्याचा हा प्रयत्न नागरिकांसाठीही महत्त्वाचा ठरणार असून, वृक्षलागवडीनंतर त्यांची नियमित देखभाल आणि संवर्धन करण्याची जबाबदारीही महत्त्वाची आहे. या उपक्रमाला स्थानिक नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, नागरिकांच्या सहभागातून ‘ग्रीन दत्त मंदिर रोड’ हा वाकड परिसरातील एक हरित आणि आकर्षक मार्ग म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.