अन् एकेदिवशी गुजरातला देशाची आर्थिक राजधानी घोषित केले जाईल…जयंत पाटलांनी व्यक्त केली भिती

Untitled Design   2023 03 21T221332.875

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही आहे पण ज्याप्रमाणे निर्णय घेतले जात आहेत त्याप्रमाणे एकेदिवशी मुंबईचे महत्त्व कमी होईल आणि गुजरातला देशाची आर्थिक राजधानी घोषित केले जाईल की काय? अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली. तसेच गुजरातला मुंबईविषयी आकस असणे स्वाभाविक आहे. मुंबई गुजरातला मिळाली नाही याचे त्यांना दुःख आहे. मात्र या मुंबईसाठी १०५ हुतात्म्यांनी हौतात्म्य पत्करले आहे. अशा शब्दात जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंतराव पाटील यांनी २९३च्या चर्चेवर बोलताना केंद्र सरकारसह राज्यातील शिंदे सरकारच्या भ्रष्टाचारावर जोरदार टीका केली. पाटील म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी लाख म्हणोत की, महाविकास आघाडी सरकार असताना आमच्यावर अन्याय झाला, मात्र महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातच मुख्यमंत्र्यांनी या खात्याच्या माध्यमातून अनेकांचे ‘कल्याण’ केले.

पुढे बोलताना पाटील म्हणाले, महाराष्ट्र शासनाचे नगरविकास खाते हे शासनाच्या कारभारातील अत्यंत महत्त्वाचे खाते आहे. मुख्यमंत्री महोदय स्वतः गेल्या ७-८ वर्षांपासून या खात्याचा कार्यभार हाकत आहेत याकडे सभागृहाचे लक्ष जयंत पाटील यांनी वेधले. नगरविकास खात्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे मुंबई शहर आहे. अनेकांसाठी ही मुंबई पोट भरणारी आहे, अनेकांसाठी ती घर आहे, अनेकांसाठी ती लक्ष्मी आहे, अनेकांसाठी स्वप्न आहे तर अनेकांसाठी माय आहे हेही जयंत पाटील यांनी आवर्जून सांगितले.

राज्यात सत्तांतर झाले आणि मुंबई खुल्या तिजोरीसारखी आपल्याला मिळाली अशी भावना सत्ताधाऱ्यांच्या मनात जागृत झाली आहे असा थेट आरोप यावेळी पाटील यांनी केला. मागील मुंबई मनपा निवडणुकीत साम – दाम – दंड – भेद या सर्व गोष्टींचा वापर करून शिवसेना मनपा निवडणुकीत चितपट करण्याचा डाव त्यांच्या मित्रांनी आखला होता. खरंतर इथेच महाविकास आघाडीच्या जन्माची चाहूल लागली हा ही खुलासा जयंत पाटील यांनी यावेळी केला.

‘आता राष्ट्र, नो महाराष्ट्र’, तावडे म्हणाले मला आता राज्यातील राजकारणात रस नाही

मुंबई महापालिकेकडे काही ठेवी आहेत. त्या ठेवींवर सत्ताधाऱ्यांचा डोळा आहे. १२ हजार कोटी रुपये महापालिकेच्या ठेवीमधून काढण्याची तरतूद महापालिकेच्या बजेटमध्ये करण्यात आली आणि पालिकेच्या तिजोरीवर हात मारला गेला. मुंबई सुशोभीकरणाच्या नावाखाली तुम्ही ज्या गोष्टी चांगल्या होत्या त्याचीही तोडफोड करून नवी कामे सुरू केली. गरज नाही तिथे खर्च केला जात आहे अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली.

शिवसेना राम मंदिराला विरोध करणाऱ्या काँग्रेस बरोबर गेली… तावडेंचा ठाकरेंवर निशाणा

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे या मुंबई शहरावर प्रचंड प्रेम होते. मुंबईची सत्ता भाजपच्या हातात देणे हे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना पटले नसते. मात्र आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हे काम होत आहे. मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा नियोजनबद्ध कार्यक्रम आखला जात आहे असा हल्लाबोलही जयंत पाटील यांनी केला.

Tags

follow us