आसामी की पुणेरी, कुठलं ‘भीमाशंकर’ खरं?

आसामी की पुणेरी, कुठलं ‘भीमाशंकर’ खरं?

भगवान शंकर तसे दुर्लक्षितच…अंगाला भस्म आणि स्मशानभूमीत वास असणारी देवता अशी ओळख… आणि त्यामुळेच हिंदू कुटुंबीयांच्या देव्हाऱ्यात तुलनेने कमी प्रमाणात दिसणारी देवता, हल्ली मात्र मोठ्या प्रमाणात चर्चेत आली ती आसाम सरकारच्या एका जाहिरातीमुळे. आसाम सरकारने सहावे ज्योतिर्लिंग भीमाशंकर डाकिनीमध्ये असल्याचा दावा केलाय. या दाव्यानंतर मात्र राजकारण्यांना आयताच विषय मिळालाय. कारण आतापर्यंत रोजगार, मोठ-मोठे उद्योगधंदे पळवण्यापर्यंत सुरू असलेली चर्चा, थेट देव, श्रद्धा स्थानं तसेचं सांस्कृतिक वारसा पळवण्यापर्यंत येऊन ठेपली आहे.
पण येथे खऱ्या अर्थाने प्रश्न उपस्थित होतो तो हा की, खरेच देव पळवणे शक्य आहे का? तो पळवण्याचा प्रयत्न होत असेल तर का होतोय? आणि महत्त्वाचं म्हणजे नेमकं कुठलं ज्योतिर्लिंग 6वे असावे, पुण्यातील की आसाममधील भीमाशंकर? या सर्व प्रश्नांचा आढावा आपण या लेखात घेणार आहोत.
आसाम सरकारचा नेमका दावा काय?
महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आसाम सरकारने 14 फेब्रुवारीला एक जाहिरात प्रसिद्ध केली. यात भारतातले सहावे ज्योतिर्लिंग भीमाशंकर, कामरुपच्या डाकिनी पर्वतावर आपलं स्वागत आहे असे म्हटले आहे. याचबरोबर जाहिरातीत त्यांनी डाकिनी भीमशंकर सहावे ज्योतिर्लिंग असल्याचा दावा केलाय.
आसामच्या या जाहिरातीमुळे दोन्ही राज्यांमध्ये वाद पेटला आणि चर्चा सुरू झाली ती देव पळवण्याची आणि सहावे ज्योतिर्लिंग नेमके कोणते याची. तर याबाबत पुराणात काय दाखले आहेत पाहू या …
1.’डाकिनी भीमाशंकरम् द्वादश ज्योतिर्लिं­­ग’
आसाम सरकारने 6व्या ज्योतिर्लिंग भीमाशंकरवर दावा करताना शिवपुरणातील दाखला दिलाय. द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रात डाकिनी भीमाशंकरम् असा उल्लेख सापडतो.
याबाबत जाणकार सांगतात…भीमा नदीकाठी वसलेले ज्योतिर्लिंग हे भीमाशंकर म्हणून अनादीकालापासून प्रसिध्द आहे. शिवपुराण आणि शिवलीलामृतात याचा उल्लेख आढळतो. शंकराचार्यांनी देखील सह्याद्री पर्वत रांगात भीमा नदीच्या काठी वसलेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगावर काव्य रचले आहे. केवळ नाम साधर्म्यामुळे ज्योतिर्लिंग भीमाशंकर आसाममध्ये जाऊ शकत नाही.

2.पुण्यात डाकिनी स्थानाचा उल्लेख नाही
वास्तविक डाकिनी भीमाशंकरम् हे द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रात लिहिलेले आहे. पण केवळ डाकिनीवरून नेमके स्थान कळू शकत नाही. मान्यतेनुसार, भीमाशंकर ज्योतिर्लिंग भीमा नदीच्या काठावर, मुंबईच्या पूर्वेला आणि पुण्याच्या उत्तरेस आहे. भीमा नदीचा आधार बनल्याने ज्योतिर्लिंगाची ओळख भीमाशंकर अशी आहे. येथील डाकिनी नावाच्या जागेबद्दल काहीही माहिती नाही. येथे सह्याद्रीच्या पर्वतावर भगवान शिव विराजमान आहेत. तेथून भीमा नदीचा उगम होतो. प्राचीन काळी येथे डाकिनी नावाची वस्ती असण्याची शक्यता आहे.

3.शिवपुराणाच्या रुद्र संहितेत कामरुप देश (आसामचा) उल्लेख

शिवपुराणाच्या रुद्र संहितेत असे लिहिले आहे की, लोकहिताच्या उद्देशाने भगवान शिव कामरूप देशात म्हणजेच आत्ताच्या आसाममध्ये ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले. त्याप्रमाणेच आसाममध्ये गुवाहाटीच्या जवळ डाकिनी येथे भीमशंकर मंदिर आहे. तिथे लाखो भाविक दर्शनासाठी जातात. पण, आसाम सरकार दावा करतेय त्याप्रमाणे हे सहावं ज्योतिर्लिंग नाही… हे ज्योतिर्लिंग आहे की नाही याबद्दल कुठलेही अधिकृत पुरावे नाहीत…
याबाबत आसामच्या पुरातत्व विभागाच्या डायरेक्टर डॉ. दीपी रेखा कौली यांनी ‘शिवपुराणाचा संदर्भ देत सांगितलं की, ‘१२ ज्योतिर्लिंगापैकी एक आसामच्या डाकिनी टेकडीवर असल्याचा उल्लेख शिवपुराणात आहे. पण, डाकिनी येथे ज्योतिर्लिंग आहे की नाही याबाबत कुठलेही पुरावे, शिलालेख किंवा लेखन सापडलेले नाही.’

तसे पाहता देशात एकूण 64 ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी 12 मुख्य ज्योतिर्लिंग असल्याची मान्यता आहे. (सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, परळी वैद्यनाथ, भीमाशंकर, रामेश्वर, नागेश्वर, काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, केदारनाथ आणि घृष्णेश्वर) त्यामुळे आसाम सरकार कितीही दावा करत असले तरी डाकिनी भीमाशंकर हे सहावे ज्योर्तिंलिंग असू शकत नाही, किंबहुना त्यांच्याकडे त्याबाबत ठोस पुरावे नाहीत. तूर्तास तरी पुण्यातील भीमाशंकरच सहावे ज्योतिर्लिंग असणार आहे. त्यामुळे आता आपण फारसे या वादात न पडता भोलेनाथाच्या भक्तीत लीन होऊ या…
बोला हर हर महादेव!

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube