“केवळ बैठकीला आले नाहीत म्हणून आमदार अपात्र ठरत नाहीत”! CM शिंदेंसह सर्व 16 आमदार पात्र

“केवळ बैठकीला आले नाहीत म्हणून आमदार अपात्र ठरत नाहीत”! CM शिंदेंसह सर्व 16 आमदार पात्र

मुंबई : सुनील प्रभू यांनी जेव्हा बैठक बोलावली तेव्हा ते प्रतोद नव्हतेच. त्यामुळे त्यांना बैठक बोलविण्याचा कोणताही अधिकार नाही. मात्र त्यानंतरही केवळ बैठकीला आले नाहीत म्हणून दहाव्या परिशिष्ठानुसार आमदार अपात्रतेच्या निकषात बसत नाहीत, असे निरीक्षण नोंदवत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदार पात्र असल्याचा सर्वात मोठा निकाल दिला. शिवसेना आमदार अपात्रता याचिकेवर आज (10 जानेवारी) रोजी विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात नार्वेकर यांनी निकालाचे वाचन केले.

खरी शिवसेनाही एकनाथ शिंदे यांचीच!

शिवसेना आमदार अपात्रता याचिकेवर निकाल देताना नार्वेकर यांनी खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचाच गट असल्यावरही शिक्कामोर्तब केले. शिवसेनेची घटना, पक्ष संघटना आणि बहुमत या गोष्टींचा आधार घेत खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निर्णय त्यांनी दिला. शिवसेनेच्या पक्षांतर्गत निवडणुकीत ठाकरे यांची 2018 मध्ये पक्षप्रमुखपदी झालेली निवड आणि पक्षातील निर्णयाचे सर्व अधिकार देणारी पक्षाच्या घटनेतील दुरुस्तीची नोंद केंद्रीय निवडणूक आयोगाने अधिकृतपणे घेतलेली नाही.

त्यामुळे शिवसेनेच्या 1999 च्या पक्षघटनेनुसार शिवसेनाप्रमुख आणि राष्ट्रीय कार्यकारिणी यांना निर्णयाचे सर्वाधिकार आहेत. शिवसेनाप्रमुख आणि पक्षप्रमुख ही दोन्ही पदे वेगवेगळी असून उद्धव ठाकरे यांना पक्षादेश जारी करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या कोणत्याही सदस्याला हटवण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांना नाही. शिंदेंना हटवण्यासाठी उद्धव यांना बहुमत हवे होते, ते त्यांच्याकडे नव्हते. त्यामुळे शिंदे यांना हटवणे चुकीचे होते. याशिवाय राष्ट्रीय कार्यकारिणीचे मत म्हणजे पक्षाची अधिकृत भूमिका आहे, असा निकाल नार्वेकर यांनी दिला आहे.

सर्व आमदारही पात्र :

त्याचवेळी वेगवेगळ्या कारणांचा आधार घेत दोन्ही गटांच्या आमदारांविरुद्धच्या अपात्रता याचिका अध्यक्षांनी फेटाळून लावल्या. याबाबतचा निकाल देताना नार्वेकर म्हणाले, उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगल्यावर 21 आणि 22 जून 2022 रोजी बोलाविलेली बैठक, विधानसभा अध्यक्षांची निवड, शिंदे-फडणवीस सरकारचा विश्वासदर्शक ठराव यासंदर्भात शिंदे गटातील आमदारांना बजावलेले पक्षादेश त्यांनी न पाळल्याने अपात्र ठरविण्याची मागणी ठाकरे गटाने केली होती. तर शिंदे गटानेही आपलाच गट मूळ शिवसेना असून सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी बजावलेला व्हीप ठाकरे गटातील आमदारांनी न पाळल्याने त्यांना अपात्र ठरविण्याची मागणी केली होती.

मात्र ठाकरे-शिंदे गटाकडून आमदारांना मोबाईल, व्हॉट्सअॅप, ईमेल पाठविलेले व्हीप अनेकांना मिळालेले नाहीत, शिंदेंसह काही आमदारांचे ईमेल पत्ते चुकीचे होते, ते मिळाल्याचे पुरावे योग्यप्रकारे सादर करण्यात आलेले नाहीत, तर अधिकार नसलेल्या त्रयस्थ व्यक्तींनी हे व्हीप पाठविले, अशी विविध कारणे देत नार्वेकर यांनी अपात्रतेबाबतच्या दोन्ही गटाच्या याचिका फेटाळून लावल्या. त्यामुळे या निकालानंतर ‘शिवसेने’चे सारेच आमदार पात्र ठरले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube