अशोक खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही; बावनकुळेंचा थेट बडतर्फीची इशारा

खरातच्या मोबाईल कॉलिंगचे सीडीआर समोर आल्याची माहिती असून, त्यामध्ये काही दिग्गज नेते आणि सरकारी अधिकाऱ्यांची नावे असल्याची चर्चा रंगली आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 37

Bawankule’s direct threat of dismissal : राज्यात सध्या नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरणाने मोठं राजकीय आणि प्रशासकीय वादळ निर्माण केलं आहे. अशोक खरात याच्या एकापेक्षा एका धक्कादायक कारनाम्यांचा पर्दाफाश होत असताना, आत या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. खरातच्या मोबाईल कॉलिंगचे सीडीआर समोर आल्याची माहिती असून, त्यामध्ये काही दिग्गज नेते आणि सरकारी अधिकाऱ्यांची नावे असल्याची चर्चा रंगली आहे.

याच पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. अशोक खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर केवळ बदलीची कारवाई न करता थेट बडतर्फीची कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. कोणत्याही खात्यातील अधिकारी असो, दोषी आढळल्यास त्यांना सेवेतून काढून टाकण्यात येईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

बावनकुळे यांनी या प्रकरणाला महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारी घटना असे संबोधत, यामध्ये कोणालाही पाठीशी घालणार नसल्याचं स्पष्ट केलं. सध्या या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथक करत असून, ज्यांच्याकडे ठोस पुरावे असतील त्यांनी ते SIT कडे सादर करावेत, असे आवाहन देखील त्यांनी केले. तपासादरम्यान ज्या ज्या अधिकाऱ्यांची नावे समोर येतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे देखील त्यांनी नमूद केले.

तसेच अशोक खरातच्या कार्यक्षेत्रातील CCTV फुटेज तपासण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यातून समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कारवाई होणार असल्याचे संकेत आहेत. खरातला जमिनी आणि मालमत्ता गोळा करण्यासाठी मदत करणाऱ्यांना देखील सोडले जाणार नाही, असे देखील बावनकुळे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडे सीडीआर कसे आले, यासंदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नांवर देखील बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. संजय राऊत यांनी उपस्थित केलेल्या शंकेला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्री कार्यालय अशा प्रकारची संवेदनशील माहिती देत नाही. संबंधितांनी ही माहिती स्वतःच्या पातळीवर मिळवली असावी.

दमानिया यांच्याकडे असलेली माहिती अत्यंत महत्वाची असून ती त्यांनी SIT कडे द्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले. तसेच, ता प्रकरणात जे कोणी दुष्कृत्यात सहभागी आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील त्यांनी पुन्हा एकदा दिला. एकूणच, अशोक खरात प्रकरणात आता तपास अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून, राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

follow us