Bisleri Water : ‘पाणी विकणार?’ म्हणून हसले पण, प्रत्येकाच्या जिभेवर बिस्लेरी आली कशी?
Bisleri Water मिनरल वॉटरचे नाव ऐकताच, जिभेवर पहिले नाव येते ते म्हणजे बिस्लेरी. आपण दुकानदाराला सहज म्हणतो भाऊ, एक बिस्लेरी द्या
Bisleri Water Quality Crises : देशभरात प्रसिद्ध असलेल्या ‘बिस्लेरी’च्या पाण्याच्या नमुन्यांबाबत FSSAI ने कारवाई केल्याच्या आणि खटला चालवण्यास मंजुरी दिल्याच्या चर्चांमुळे सध्या मोठा वाद सुरू आहे. या प्रकरणावरून प्रश्न उपस्थित होत असतानाच, बिसलेरीने यावर आपले स्पष्टीकरण दिले आहे. पण तुम्हाला माहितीये का, ज्या ब्रँडच्या गुणवत्तेवर आज चर्चा होतेय, त्या ब्रँडची सुरुवात झाली होती तेव्हा “पाणी विकणार? वेडा झालाय का?” अशी त्याची खिल्ली उडवली गेली होती! चला तर मग, हा वाद, कंपनीचे स्पष्टीकरण आणि बिसलेरीचा आतापर्यंतचा प्रवास जाणून घेऊया.
आपण घराबाहेर पडतो, सहलीला जातो किंवा एखाद्या अनोळखी शहरात जातो, तेव्हा बहुतेक वेळा मिनरल वॉटरच आपली तहान भागवते. मिनरल वॉटरचे नाव ऐकताच, जिभेवर पहिले नाव येते ते म्हणजे बिस्लेरी. आपण पाण्याची बाटली मागताना दुकानदाराला म्हणतो”भाऊ, एक बिस्लेरी द्या!”
आता गंमत पाहा… तुम्ही त्याच्याकडे मिनरल वॉटर मागितलेलं नसतं. तुम्ही फक्त बिसलेरी मागितलेली असते. कारण भारतात बिस्लेरी हे नाव केवळ एका कंपनीचं नाव राहिलेलं नाही, तर बाटलीबंद पाण्याची ओळख बनलं आहे. पण आज याच बिस्लेरीच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अर्थात FSSAI ने बिस्लेरीच्या गोवा प्लांटमधून घेतलेल्या पाण्याच्या नमुन्याला असुरक्षित घोषित केलं आहे. एवढंच नाही, तर कंपनीविरोधात खटला चालवण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. दुसरीकडे, बिस्लेरीने हे निष्कर्ष मान्य केलेले नाहीत. कंपनीने स्वतंत्र प्रयोगशाळेच्या तपासणीचा हवाला देत आपलं पाणी सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. म्हणजेच एका बाजूला सरकारी यंत्रणेचे निष्कर्ष, तर दुसऱ्या बाजूला कंपनीचं स्पष्टीकरण…
बिसलेरीची सुरुवात भारतात नाही, तर इटलीमध्ये
बिस्लेरीची कहाणी सुरू होते इटलीमध्ये. फेलिस बिस्लेरी या इटालियन उद्योजकाने या ब्रँडची सुरुवात केली. त्यांच्याच नावावरून या ब्रँडला बिस्लेरी हे नाव मिळालं. पण हा ब्रँड भारतात आणण्यामागे खुसरो संतूक यांचाही महत्त्वाचा वाटा होता. 1965 मध्ये मुंबईत बिस्लेरीने भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला. मात्र, त्यावेळची परिस्थिती आजच्यासारखी नव्हती. आज आपण प्रवासात असताना सहज 20 रुपयांची पाण्याची बाटली विकत घेतो.
पण 1960 च्या दशकात? लोकांना पाणी विकत घेण्याची कल्पनाच नवीन होती. कारण भारतात पाणी ही विकत घेण्याची वस्तू नसून सहज उपलब्ध होणारी नैसर्गिक गोष्ट मानली जात होती. लोकांच्या मनात एक साधा प्रश्न होता… जे पाणी मोफत मिळतं, त्यासाठी पैसे का द्यायचे? त्यामुळे सुरुवातीला बिस्लेरीचे ग्राहक प्रामुख्याने मोठी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि उच्चभ्रू वर्गातील लोक होते. म्हणजेच बाजारपेठ होती, पण ती अत्यंत मर्यादित होती.
आणि इथेच या ब्रँडच्या कहाणीला एक महत्त्वाचं वळण मिळालं. 1969 मध्ये पारले समूहाने बिस्लेरी विकत घेतली. या व्यवहाराची किंमत साधारण चार लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, पारले समूहाने सुरुवातीला बिस्लेरी विकत घेतली तेव्हा त्यांचं लक्ष केवळ पाण्याच्या व्यवसायावर नव्हतं. बिस्लेरीच्या सोडा व्यवसायालाही महत्त्व होतं. पण पुढे याच पाण्याच्या व्यवसायाने भारतीय बाजारपेठेत इतिहास घडवला.
रमेश चौहान यांची पाण्याला व्यवसायात बदलणारी कल्पना
बिस्लेरीला भारतात मोठं करण्याचं श्रेय प्रामुख्याने रमेश चौहान यांच्या व्यावसायिक दूरदृष्टीला दिलं जातं. त्यांनी एक गोष्ट ओळखली होती. भारतासारख्या मोठ्या देशात बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय करायचा असेल, तर केवळ श्रीमंत ग्राहकांवर अवलंबून राहून चालणार नाही. हे पाणी सामान्य माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे. पण त्यासाठी एक मोठी अडचण होती. ती म्हणजे काचेच्या बाटल्या…
काचेच्या बाटल्या जड होत्या. त्यांची वाहतूक खर्चिक होती. बाटल्या ग्राहकांकडून परत गोळा करण्याची जबाबदारीही होती. त्यामुळे व्यवसायाचा विस्तार करणं सोपं नव्हतं. अशा परिस्थितीत कंपनीने प्लास्टिकच्या बाटल्यांचा पर्याय स्वीकारला. 1980 च्या दशकाच्या मध्यापासून प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर वाढल्यामुळे पाण्याचं पॅकेजिंग हलकं झालं, वाहतूक सोपी झाली आणि वितरण व्यवस्थेला गती मिळाली. यामुळे बिस्लेरीला अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली.
इथे कंपनीने केवळ बाटली बदलली नव्हती, तर व्यवसाय करण्याची पद्धतच बदलली होती आणि हळूहळू बाटलीबंद पाणी हे श्रीमंतांचं उत्पादन न राहता सामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचू लागलं. पुढे कंपनीने छोट्या बाटल्यांपासून मोठ्या पॅकपर्यंत उत्पादनांची श्रेणी वाढवली. 1991 मध्ये 20 लिटरचा जार बाजारात आला. यामुळे घरं आणि कार्यालयांमध्येही बिस्लेरीचा वापर वाढण्यास मदत झाली. म्हणजेच, एका काळी लोक ज्या पाण्यासाठी पैसे देण्यास तयार नव्हते, त्याच पाण्याला कंपनीने मोठी बाजारपेठ मिळवून दिली
बिस्लेरीचा व्यवसाय वाढत गेला, तसतशी बाटलीबंद पाण्याच्या बाजारपेठेत इतर मोठ्या कंपन्यांचीही एंट्री झाली. कोका-कोला समूहाने किनले हा ब्रँड आणला. पेप्सीने अॅक्वाफिना बाजारात आणलं. इतर अनेक स्थानिक आणि राष्ट्रीय कंपन्यांनीही या व्यवसायात प्रवेश केला. मात्र, बिस्लेरीला एक मोठा फायदा होता. तो म्हणजे ग्राहकांच्या मनात आधीच तयार झालेली ओळख…
रेल्वे स्टेशन असो, बसस्थानक असो, हॉटेल असो किंवा रस्त्याच्या कडेला असलेलं छोटंसं दुकान…बिस्लेरीने आपलं वितरण जाळं मोठ्या प्रमाणावर विस्तारलं आणि इथे एक महत्त्वाची गोष्ट घडली. लोक पाणी मागताना अनेकदा थेट बिस्लेरी हे नाव वापरू लागले. म्हणजेच कंपनीने केवळ उत्पादन विकलं नाही, तर ग्राहकांच्या बोलण्यातही स्वतःची जागा निर्माण केली. पण व्यवसायात एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागते. ब्रँड तयार करायला अनेक वर्षं लागतात, पण त्या ब्रँडवरील विश्वासाला धक्का बसण्यासाठी एक प्रकरणही पुरेसं ठरू शकतं आणि आता बिसेलेरीसमोर नेमकं हेच आव्हान उभं राहिलं आहे.
FSSAI ची कारवाई : गोव्याच्या प्लांटमध्ये नेमकं काय घडलं?
आता येऊया या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. या वादाची सुरुवात झाली 30 सप्टेंबर 2025 रोजी. या दिवशी FSSAI च्या पथकाने बिस्लेरीच्या गोवा उत्पादन केंद्रातून पाण्याचे सहा नमुने घेतले. प्राथमिक तपासणीत सहा पैकी पाच नमुने निर्धारित गुणवत्ता निकषांनुसार योग्य असल्याचं आढळलं. मात्र, सहाव्या नमुन्याबाबत प्रश्न उपस्थित झाला. या नमुन्यात ब्रोमेटचं प्रमाण 12 मायक्रोग्रॅम प्रति लिटर आढळलं. तर, निर्धारित मर्यादा होती 10 मायक्रोग्रॅम प्रति लिटर. म्हणजेच या नमुन्यात ब्रोमेटचं प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त होतं.
आता ब्रोमेट म्हणजे नेमकं काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर, ब्रोमेट हे एक रासायनिक संयुग आहे. पाण्याच्या निर्जंतुकीकरण प्रक्रियेदरम्यान, विशेषतः ओझोनचा वापर होत असताना, काही परिस्थितींमध्ये त्याची निर्मिती होऊ शकते. पिण्याच्या पाण्यात त्याचं प्रमाण निर्धारित मर्यादेत ठेवणं महत्त्वाचं असतं. या प्राथमिक निष्कर्षानंतर बिस्लेरीने त्याविरोधात अपील केलं आणि त्यानंतर हा नमुना पुढील तपासणीसाठी रेफरल लॅबोरेटरीकडे पाठवण्यात आला.
इथेच या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. रेफरल लॅबोरेटरीच्या तपासणीत ब्रोमेट निर्धारित मर्यादेत असल्याचं सांगण्यात आलं. मात्र त्याच नमुन्यात PAHs म्हणजेच Polycyclic Aromatic Hydrocarbons हे घटक आढळल्याचं नमूद करण्यात आलं. PAHs हा रासायनिक संयुगांचा एक समूह आहे. या समूहातील काही संयुगे दीर्घकाळ संपर्कात आल्यास आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करू शकतात. म्हणजेच, प्राथमिक तपासणीमध्ये ब्रोमेटचा मुद्दा होता, तर पुढील तपासणीत PAHs चा मुद्दा समोर आला. या प्रयोगशाळेच्या निष्कर्षांच्या आधारे FSSAI ने पाण्याचा नमुना असुरक्षित घोषित केला आणि बिसलेरी इंटरनॅशनलविरोधात Food Safety and Standards Act, 2006 अंतर्गत खटला चालवण्यास मंजुरी दिली.
पण इथे एक महत्त्वाचा फरक समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. ते म्हणजे खटला चालवण्यास मंजुरी मिळणं आणि न्यायालयाने कंपनीला दोषी ठरवणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. सध्या समोर आलेली बाब ही नियामक कारवाईची आहे. कंपनीचा अंतिम कायदेशीर दोष न्यायालयीन प्रक्रियेतच निश्चित होईल.
FSSAI च्या कारवाईनंतर बिस्लेरीनेही आपली बाजू मांडली. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे प्रकरण सप्टेंबर 2025 मध्ये गोवा प्लांटमध्ये तयार करण्यात आलेल्या एका बॅचशी संबंधित आहे. कंपनीने सांगितलं की, 30 सप्टेंबर 2025 रोजी FSSAI ने घेतलेल्या सहा नमुन्यांपैकी पाच नमुने निर्धारित निकषांनुसार योग्य होते. सहाव्या नमुन्यात ब्रोमेटचं प्रमाण 12 मायक्रोग्रॅम प्रति लिटर आढळलं होतं. यानंतर कंपनीने 22 नोव्हेंबर 2025 रोजी या निष्कर्षाविरोधात अपील केलं. पुढे रेफरल लॅबोरेटरीच्या तपासणीत ब्रोमेटचं प्रमाण निर्धारित मर्यादेत असल्याचं सांगण्यात आलं. मात्र त्याच नमुन्यात PAHs आढळल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला.
या दोन निष्कर्षांमधील फरकाबाबत कंपनीने प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर बिस्लेरीने त्याच नमुन्याची FSSAI मान्यताप्राप्त स्वतंत्र प्रयोगशाळेत तपासणी करून घेतल्याचं सांगितलं. या स्वतंत्र तपासणीतही ब्रोमेटचं प्रमाण निर्धारित मर्यादेत असल्याचं आढळल्याचा दावा कंपनीने केला.
कंपनीने 2 फेब्रुवारी 2026 रोजी या स्वतंत्र तपासणीचा अहवाल FSSAI च्या पश्चिम विभागीय कार्यालयाकडे सादर केला होता. त्यानंतर कोणताही पुढील प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे हे प्रकरण संपल्याचं आपल्याला वाटलं, असंही कंपनीने स्पष्ट केलं. कंपनीच्या म्हणण्यानुसार, तिला या कारवाईबाबत ई-मेल किंवा प्रत्यक्ष स्वरूपात नोटीस मिळालेली नव्हती. याशिवाय बिस्लेरीने आपल्या उत्पादन प्रक्रियेत दहा टप्प्यांमध्ये 90 पेक्षा जास्त गुणवत्ता चाचण्या केल्या जात असल्याचाही दावा केला आहे. कंपनीने उत्पादन सुरक्षित असल्याचं सांगत नियामक यंत्रणेला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे.
कंपनीने स्वतंत्र प्रयोगशाळेचा अहवाल दिला आहे, पण उपलब्ध स्पष्टीकरणात PAHs बाबत नेमकी कोणती संयुगे आढळली, त्यांचं प्रमाण किती होतं आणि त्या तपासणीचे संपूर्ण निष्कर्ष काय होते, याची सविस्तर माहिती स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे कंपनीचा दावा आणि FSSAI चा निष्कर्ष या दोन्हींची स्वतंत्रपणे पडताळणी होणं आवश्यक आहे.
आता या संपूर्ण प्रकरणात सर्वसामान्य ग्राहकांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो…बिस्लेरीचं पाणी प्यायचं की नाही? या प्रश्नाचं उत्तर देताना दोन गोष्टी समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे, FSSAI च्या कारवाईचा संबंध एका विशिष्ट नमुन्याशी आणि गोवा प्लांटमधील संबंधित उत्पादन बॅचशी आहे. त्यामुळे या एका प्रकरणावरून देशभरातील बिस्लेरीच्या सर्व बाटल्या असुरक्षित आहेत, असा निष्कर्ष काढणं चुकीचं ठरेल.
दुसरी गोष्ट म्हणजे, कंपनीने आपलं उत्पादन सुरक्षित असल्याचा दावा केला आहे म्हणून नियामक संस्थेच्या निष्कर्षांकडे दुर्लक्ष करणंही योग्य ठरणार नाही. कारण पिण्याच्या पाण्याचा विषय थेट सार्वजनिक आरोग्याशी संबंधित आहे. या प्रकरणात नेमके कोणते PAHs आढळले? त्यांचं प्रमाण किती होतं? स्वतंत्र प्रयोगशाळेच्या तपासणीमध्ये त्याबाबत काय निष्कर्ष नोंदवण्यात आले? आणि FSSAI च्या अहवालाशी त्याची तुलना काय सांगते? या प्रश्नांची उत्तरं अधिकृत तपासणी अहवाल आणि न्यायालयीन प्रक्रियेतून स्पष्ट होईल. त्यामुळे ग्राहकांनी अफवांवर विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत माहितीवर लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे.
एकेकाळी भारतात बाटलीबंद पाणी विकण्याची कल्पनाच अनेकांना वेडेपणाची वाटत होती. पण बिसलेरीने त्याच कल्पनेत भविष्यातील मोठी बाजारपेठ पाहिली. 1965 मध्ये भारतात प्रवेश केलेल्या या ब्रँडने पुढे प्लास्टिकच्या बाटल्या, मजबूत वितरण व्यवस्था आणि प्रभावी ब्रँडिंगच्या जोरावर भारतीय ग्राहकांच्या मनात आपली जागा निर्माण केली. काचेच्या बाटल्यांपासून आधुनिक पॅकेजिंगपर्यंतचा प्रवास केला. मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करत स्वताची एक अशी ओळख निर्माण केली की, आज अनेकदा बाटलीबंद पाण्याला आपण सरळ बिस्लेरी म्हणतो. पण आज या ब्रँडसमोर आव्हान वेगळं आहे.
आज आव्हान बाजारपेठ जिंकण्याचं नाही तर, आव्हान आहे ते वर्षानुवर्षे कमावलेला ग्राहकांचा विश्वास टिकवण्याचं… कारण पाण्याच्या व्यवसायात जाहिरात महत्त्वाची असते, वितरण व्यवस्था महत्त्वाची असते, ब्रँडची लोकप्रियताही महत्त्वाची असते. पण या सगळ्यांपेक्षा महत्त्वाची असते ती उत्पादनाची गुणवत्ता… कारण पाणी विकता येतं पैशाने, पण विश्वास कमवावा लागतो गुणवत्तेने… आता पाहायचं एवढंच आहे की, या संपूर्ण प्रकरणात पुढे काय निष्कर्ष समोर येतात आणि बिस्लेरी आपल्या ग्राहकांचा विश्वास कायम ठेवण्यात कितपत यशस्वी ठरते.
Bisleri International Pvt. Ltd. issues statement after the Food Safety and Standards Authority of India (FSSAI) had sanctioned prosecution against Bisleri International Pvt. Ltd. under the Food Safety and Standards Act, 2006, after a sample of its packaged drinking water failed safety tests.
“We are aware of recent media reports that the Food Safety and Standards Authority of India (FSSAI) has issued a notice to Bisleri. The matter dates back approximately 14 months, to a batch produced in September 2025 at Bisleri’s Goa manufacturing facility, one of 143 plants in our network. On 30 September 2025, FSSAI collected six samples from the Goa facility. Initial testing found that five samples met all applicable standards. The sixth recorded a bromate level of 12 micrograms per litre, against the prescribed limit of 10 micrograms per litre. Following Bisleri’s appeal dated 22 November 2025, FSSAI sent that sample to a referral laboratory for retesting. The referral laboratory found bromate of the sample within the prescribed limit and separately flagged polynuclear aromatic hydrocarbons (PAHs) in the sample. The difference between the two results raised questions that Bisleri believed warranted clarification. Bisleri arranged for the same sample to be tested independently at an FSSAI-approved laboratory. That test found bromate within the prescribed limit.
We submitted the independent test results to FSSAI’s Western Regional Office with a formal letter dated 2 February 2026. We received no further communication from FSSAI after that submission and understood the matter to be closed. To date, Bisleri has received no notice by email or in hard copy and has been unable to locate the reported notice on FSSAI’s website. Drinking water safety is a priority for Bisleri. We maintain stringent quality controls of over 90 tests across our 10-step manufacturing process and will continue to cooperate with FSSAI to address the matter through the appropriate regulatory process. A trusted brand for years, Bisleri remains safe for consumption…”
— ANI (@ANI) November 23, 2026