मुंबईत मृत्यूनंतर चार वर्षे फ्रीझरमध्ये जतन केला मृतदेह, अमेरिकेत क्रायोनिक्ससाठी पाठवण्याचा कुटुंबाचा प्रयत्न
कुटुंबातील 80 वर्षीय व्यक्तीच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांनी तब्बल चार वर्षे त्यांचा मृतदेह फ्रीझरमध्ये जतन करून ठेवला होता.
Body preserved in a freezer for four years : मुंबईतील मालाड परिसरात एक धक्कादायक आणि तितकीच भावनिक घटना समोर आली आहे. कुटुंबातील 80 वर्षीय व्यक्तीच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आणि दोन प्रौढ मुलांनी तब्बल चार वर्षे त्यांचा मृतदेह फ्रीझरमध्ये जतन करून ठेवला होता. भविष्यात विज्ञानाच्या प्रगतीमुळे त्यांना पुन्हा जिवंत करता येईल, या आशेने कुटुंबाने आतापर्यंत 50 लाख रुपयांहून अधिक खर्च केला असून अमेरिकेतील क्रायोनिक्स संस्थांशीही संपर्क साधला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीचे 2022 मध्ये कर्करोग, मूत्रपिंड निकामी होणे आणि वयोमानाशी संबंधित आजारांमुळे निधन झाले होते.
सुरुवातीला कुटुंबाने मृतदेह मालाडमधील त्यांच्या घरात फ्रीझरमध्ये ठेवला होता. मात्र, इमारतीचे पुनर्विकासाचे काम सुरू झाल्यानंतर हा मृतदेह मालाडमधील एका पॉलीक्लिनिकमध्ये हलवण्यात आला. सोमवारी रात्री कुरार पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी संबंधित क्लिनिकची पाहणी केली. तेव्हा बंद अवस्थेतील क्लिनिकमध्ये फ्रीझरमध्ये मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे, क्लिनिक व्यवस्थापन आणि मालमत्ता मालकाला तेथे मृतदेह ठेवण्यात आल्याची माहितीच नव्हती. मात्र, नातेवाईक आणि परिसरातील काही लोकांना याबाबत माहिती होती.
बौद्धांनी मातंगांच्या ताटातलं खाल्लं?…SC च्या उपवर्गीकरणावर मिलिंद आव्हाड बेधडक बोलले!
तपासादरम्यान कुटुंबीयांनी सांगितले की, कुटुंबप्रमुखांच्या निधनाचा त्यांना मोठा मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे त्यांचे अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय ते घेऊ शकले नाहीत. त्यांच्या पत्नी आणि मुलांनी इंटरनेटवर क्रायोनिक्सविषयी माहिती मिळवली आणि अमेरिकेतील अशा संस्थांशी संपर्क साधला ज्या कायदेशीर मृत्यू झालेल्या व्यक्तींचे शरीर अतिशय कमी तापमानात दीर्घकाळ जतन करून ठेवतात. कुटुंबीयांनी भारतातील कायदेशीर तज्ज्ञांचाही सल्ला घेतला होता. मृतदेह अमेरिकेत पाठवणे कायदेशीरदृष्ट्या शक्य आहे का, याचाही ते अभ्यास करत होते.
या प्रक्रियेसाठी गेल्या चार वर्षांत 50 लाख रुपयांहून अधिक खर्च करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. क्रायोनिक्स ही संकल्पना अशी आहे की, मृत व्यक्तीचे शरीर उणे 196 अंश सेल्सिअस तापमानात द्रव नायट्रोजनच्या साहाय्याने जतन करून ठेवले जाते. भविष्यात वैद्यकीय आणि वैज्ञानिक तंत्रज्ञान इतके प्रगत होईल की मृत्यूमुळे झालेली शारीरिक हानी दूर करून त्या व्यक्तीला पुन्हा जिवंत करता येईल, अशी या संकल्पनेमागील आशा आहे. मात्र, सध्याच्या घडीला अशा प्रकारे जतन केलेल्या व्यक्तीला पुन्हा जिवंत करण्याची कोणतीही सिद्ध वैज्ञानिक पद्धत उपलब्ध नाही. त्यामुळे क्रायोनिक्सला अद्याप प्रयोगात्मक तंत्रज्ञान मानले जाते.
सेमीफायनलमध्ये भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय, एशियन गेम्सच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानशी होणार लढत
पोलिसांनी कुटुंबीय, क्लिनिक व्यवस्थापन आणि मालमत्ता मालकांची चौकशी केली असून या प्रकरणात कोणत्याही गैरप्रकाराचा संशय नसल्याचे स्पष्ट केले आहे. संबंधित व्यक्तीचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाल्याचे दाखलेही कुटुंबीयांनी सादर केले आहेत. त्यामुळे अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. दरम्यान, इतक्या दीर्घकाळ मानवी मृतदेह जतन करून ठेवण्याच्या कायदेशीर बाबींचा पोलिसांकडून अभ्यास सुरू आहे. कुटुंबीय आता मृतदेह अमेरिकेतील क्रायोनिक्स संस्थेकडे पाठवायचा की पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करायचे, याबाबत निर्णय घेणार आहेत.