महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीत तुफान राडा, भरत गोगावलेंच्या मुलावर बंदूक रोखली, सुशांत जबरेंना बेदम मारहाण

या घटनेबद्दल माहिती देताना विकास गोगावले यांनी हा हल्ला सुनील तटकरे यांनी घडवून आणल्याचा थेट गंभीर आरोप केला.

  • Written By: Published:
News Photo   2025 12 02T153239.950

राज्यात आज सुरु असलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत (Election) निवडणुकीच्या मतदानाला गालबोट लावणारी घटना महाडमध्ये घडली. महाडमध्ये भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्या समर्थकांमध्ये तुफान राडा झाला. यावेळी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं दिसलं. यावेळी अनेक गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या.

भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले महाडमधील एका मतदान केंद्रावर भेट देण्यासाठी गेले होते. त्यावेळी नुकतेच शिंदे गटातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेल्या सुशांत जाबरे यांचे समर्थक त्यांच्यासमोर आले. यावेळी बाचाबाची होऊन विकास गोगावले आणि सुशांत जाबरे यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला.

या घटनेबद्दल माहिती देताना विकास गोगावले यांनी हा हल्ला सुनील तटकरे यांनी घडवून आणल्याचा गंभीर आरोप केला. माझ्यावर रिव्हॉल्व्हर रोखण्यात आल्याचाही दावा त्यांनी केला. मी दोन-तीन नंबरच्या बुथवर कार्यकर्त्यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी एका फॉर्च्युनर आणि स्कॉर्पिओ कारमधून काही लोक आले. त्यांनी आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

गेवराईमध्ये राडा! पंडित पवार आमने-सामने, भाजप नेत्याच्या घरासमोर दगडफेक

गाडीत बसलेल्या एकाने माझ्या दिशेने रिव्हॉल्व्हर रोखली. परंतु, माझ्या कार्यकर्त्याने चपळाईने ती रिव्हॉल्व्हर हिसकावून घेतली. त्यानंतर माझ्यासोबतच्या अंगरक्षकाने त्या व्यक्तीला पुढे ढकलले. माझ्या कार्यकर्त्याने वेळीच रिव्हॉल्व्हर हिसकावून घेतली नसती तर गोळी मला लागली असती किंवा माझ्या कार्यकर्त्याला लागली असती, असे विकास गोगावले यांनी म्हटले.

हा सर्व प्रकार घडला तेव्हा पोलीस पलीकडच्या बाजूला होते. समोरच्या गर्दीतील अनेकजण आंध्र प्रदेश, दिल्ली, कोलकाता या भागांतून आलेले त्यांच्या चेहऱ्यावरुन दिसत होते. माझ्या कार्यकर्त्याने त्यांच्या हातातील पिस्तूल हिसकावून घेतल्यानंतर आम्ही ती पोलिसांच्या ताब्यात देणार आहोत. हा हल्ला सुनील तटकरे यांनी घडवून आणला. त्यांच्या समर्थकांच्या गाडीत स्टम्प आणि हॉकी स्टीकही होत्या. सुनील तटकरे यांच्या सांगण्याशिवाय असा हल्ला होऊ शकत नाही.

हा रडीचा डाव सुरु आहे. लढायचं तर समोरुन लढा. विकास गोगावलेशी लहान मुलासारखं पाठीमागून लढू नका. मी आता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासठी जातोय, असे विकास गोगावले यांनी म्हटले. त्यामुळे आता पोलीस याप्रकरणात कोणावर गुन्हा दाखल करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

follow us