मोठा आर्थिक झटका! सीएनजीच्या दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ; मध्यरात्रीपासून नवे दर लागू
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून प्रति किलो 2 रुपयांची दरवाढ जाहीर करण्यात आली असून, नवे दर 9 मे 2026 च्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.
CNG price hiked again by Rs 2 : पुणेकरांसाठी पुन्हा एकदा महागाईची बातमी समोर आली आहे. पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड, तळेगाव आणि हिंजवडी परिसरात सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून (MNGL) प्रति किलो 2 रुपयांची दरवाढ जाहीर करण्यात आली असून, नवे दर 9 मे 2026 च्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. दरवाढीनंतर सीएनजीचा प्रति किलो दर 92.25 रुपयांवर पोहोचला आहे. नैसर्गिक वायूच्या खरेदी खर्चात सातत्याने वाढ होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलते दर, पुरवठ्यावरील ताण आणि वाढलेला ऑपरेशनल खर्च यामुळे सीएनजी महाग झाल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, दरवाढ झाली असली तरी सीएनजी हा अजूनही पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत स्वस्त आणि किफायतशीर पर्याय असल्याचा दावा महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने केला आहे. कंपनीच्या माहितीनुसार, पुण्यात प्रवासी कारसाठी पेट्रोलच्या तुलनेत जवळपास 45 टक्के तर डिझेलच्या तुलनेत सुमारे 22 टक्के बचत होत आहे. तसेच ऑटोरिक्षा चालकांना सीएनजीमुळे अंदाजे 24 टक्के बचत होत असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.
अशा किती ममता बॅनर्जी आल्या तरी… विजयानंतर मंत्री विखेंची खोचक टीका
मात्र, या दरवाढीचा थेट परिणाम सामान्य नागरिक, खासगी वाहनधारक आणि रिक्षाचालकांवर होणार असल्याचे दिसत आहे. गेल्या काही महिन्यांत इंधन दरांमध्ये सातत्याने चढ-उतार होत असल्याने वाहनधारकांच्या खर्चात वाढ झाली आहे. विशेषतः रोजच्या प्रवासासाठी सीएनजीवर अवलंबून असलेल्या रिक्षाचालक आणि कॅब चालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
दरवाढीनंतर अनेक वाहनधारकांनी चिंता व्यक्त केली असून, आगामी काळात भाडेवाढीची शक्यता देखील नाकारता येत नाही. रिक्षा संघटनांकडून लवकरच याबाबत बैठक घेऊन पुढील भूमिका जाहीर केली जाऊ शकते. दरम्यान, महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचे दर आज स्थिर असल्याचे पाहायला मिळाले. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 104.42 रुपये प्रति लिटर असून डिझेल 90.03 रुपये प्रति लिटर आहे. पुण्यात पेट्रोल 103.82 रुपये प्रति लिटर तर डिझेल 90.35 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. ठाण्यात पेट्रोलचा दर 103.91 रुपये प्रति लिटर असून डिझेल 90.42 रुपये प्रति लिटर आहे.
सीएनजीच्या वाढलेल्या दरामुळे पुणे आणि परिसरातील वाहनधारकांचे मासिक बजेट पुन्हा एकदा कोलमडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काळात इंधन दरांमध्ये आणखी वाढ होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.