घरफोडीची तक्रार पण फिर्यादीच निघाला आरोपी ; अहिल्यानगर शहरात नेमकं घडलं काय?

Kotwali Police : अहिल्यानगर शहरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडीसह वाहन चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ दिसून येत आहे. शहरात वाढत असणाऱ्या

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Kotwali Police

Kotwali Police : अहिल्यानगर शहरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडीसह वाहन चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ दिसून येत आहे. शहरात वाढत असणाऱ्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तर पोलिसांच्या भूमिकेवर देखील प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तर दुसरीकडे वाढत असणाऱ्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कोतवाली पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आली असून एका घरफोडीचा गुन्हा अवघ्या चार तासांत उघड केले आहे. या गुन्ह्यात फिर्यादीच आरोपी निघाल्याने शहरात अनेक चर्चांना उधाण आले आहे. शहरातील केडगाव परिसरात ही घटना घडली असून या प्रकरणात फिर्यादी आदर्श ज्ञानदेव तनपुरे याला अटक करण्यात आली आहे.

कोतवाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर २०२६ च्या सकाळी ८ च्या सुमारास फिर्यादी आदर्श ज्ञानदेव तनपुरे (वय २५, रा. तानाजी मालुसरे अपार्टमेंट, मराठानगर, केडगाव, अहिल्यानगर) व त्यांचे कुटुंबीय घरी नसताना, अज्ञात चोरट्याने मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरातून १,२५,००० रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची तक्रार कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सपोनि विशाल गोविंद चिटणीस यांच्याकडे सोपवण्यात आला.पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या आदेशानुसार गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज तपासणी तसेच डॉग स्कॉड, फिंगरप्रिंट आणि फॉरेन्सिक युनिटच्या माध्यमातून पाहणी केली. तपासादरम्यान फिर्यादी आदर्श तनपुरे यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या, तसेच ते ऑनलाइन फॉरेक्स मार्केटिंग करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी याबाबत अधिक चौकशी केली असता त्यांनी स्वतःच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आई दिवाळी सणानिमित्त माहेरी गेल्यानंतर घरात असलेली रक्कम फिर्यादीने थोडी-थोडी करून स्वतःच्या एचडीएफसी (HDFC) बँक खात्यात जमा केली. पुढे ‘XM’ या डीमॅट खात्याद्वारे फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यानंतर त्यात नुकसान झाले मात्र याबाबत घरच्यांना काहीही माहिती दिली नसल्याचे त्याने तपासात सांगितले.

पोलिसांनी HDFC बँकेतून खात्याचे विवरण प्राप्त केले असता, फिर्यादीने सांगितल्याप्रमाणे स्वतःच्या खात्यावर रक्कम जमा केल्याचे दिसून आले. तसेच पंचासमक्ष फिर्यादीचा मोबाइल जप्त करून तपासणी केली असता, त्यातही ‘XM’ डीमॅट खात्याचे विवरण आढळून आले. हा बनाव फिर्यादीनेच रचल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी त्याला अटक केली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का; काँग्रेसची मोठी आघाडी

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (शहर विभाग) दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, सपोनि विशाल गोविंद चिटणीस, पो.उप.नि. दिपक मेढे तसेच पो.हे.कॉ. बाळकृष्ण दौंड, साबीर शेख, विनोद बोरगे, विशाल दळवी, पो.कॉ. संदीप शिरसाठ, सत्यजित शिंदे, सुरज कदम, शिरीष तरटे, अतुल कोतकर, रमेश शिंदे, अतुल लाटे, संकेत धिवर, वैभव काळे आणि आकाश काळे यांनी ही कारवाई केली.

follow us