साधा शिवसैनिक, नगरसेवक ते राज्याचा मुख्यमंत्री; एकनाथ शिंदे यांची थक्क करणारी वाटचाल

साधा शिवसैनिक, नगरसेवक ते राज्याचा मुख्यमंत्री; एकनाथ शिंदे यांची थक्क करणारी वाटचाल

Eknath Shinde : महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात बंड करून सत्तापालट करण्यात महत्वाची भुमिका बजावत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) थेट राज्याचे मुख्यमंत्री पद मिळवले. बंडखोरी करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे शिंदे मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचतील असे कुणालाही वाटले नव्हते. साधा रिक्षाचालक शिवसैनिक ते राज्याचे मुख्यमंत्री असा थक्क करणारा प्रवास एकनाथ शिंदे यांचा राहिला आहे. आज (दि.९) मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde birthday) यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने शिंदे यांचा राजकारणातील प्रवास, ते मुख्यमंत्री पदापर्यंत कसे पोहोचले याचा घेतलेला हा आढावा..

सन २०१९ मध्ये निवडणुका झाल्या तेव्हा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे अशी चर्चा होती. कारण जशी परंपरा होती बाळासाहेब ठाकरे मातोश्रीवरूनच सत्ता आणि संघटन पाहत असत, उद्धव ठाकरेही (Uddhav Thackeray) तोच मार्ग अवलंबतील असे अपेक्षित होते. २०१९ च्या निवडणुकीनंतर शिवसेनेने मुख्यमंत्रिपदासाठी शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. पण उद्धव ठाकरे यांच्या रुपाने पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील एका व्यक्तीने मातोश्रीबाहेर येऊन मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली. शिंदे हे महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री झाले.

शिंदे यांचा जीवनप्रवास
एकनाथ शिंदे यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1964 सालचा. सातारा हे त्यांचं जन्मगाव. मात्र बालवयातच त्यांनी गाव सोडले आणि ठाण्यात स्थायिक झाले. शिंदे आज ५९ वर्षांचे असून त्यांनी आपल्या शालेय जीवनाची सुरुवात ठाण्यातून केली. येथे ते सुरुवातीला ऑटो रिक्षा चालवत असत. त्यादरम्यान त्यांनी शिवसेना नेते आनंद दिघे यांची भेट घेतली, ही भेट टर्निंग पॉइंट ठरली. शिंदे यांची राजकीय कारकीर्द वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी सुरू झाली.

ठाणे महापालिकेत नगरसेवक
1997 मध्ये ते ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक झाले. त्यानंतर २००१ मध्ये ते ठाणे महापालिका सभागृहात विरोधी पक्षनेते झाले. नगरसेवक असताना एका अपघातात त्यांनी त्यांचा ११ वर्षांचा मुलगा आणि सात वर्षांची मुलगी गमावली. त्यांचा दुसरा मुलगा श्रीकांत त्यावेळी १३ वर्षांचा होता. श्रीकांत शिंदे हे आज शिवसेनेचे खासदार आहेत.

राणेनंतर शिवसेनेतील महत्व वाढले
एकनाथ शिंदे यांची राजकीय पकड आणि दूरदृष्टीने हळूहळू शिवसेनेत पकड निर्माण होऊ लागली. सन २००५ मध्ये नारायण राणेंनी शिवसेना सोडली तेव्हा शिंदे यांनी पक्षातील आपली प्रतिष्ठा वाढविण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांना खूप चांगल्या संधीही मिळाल्या आणि ते पूर्ण निष्ठेने पुढे जाऊ लागले. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि पुतणे राज ठाकरे यांच्यातील वर्चस्वाच्या संघर्षात बाळासाहेबांसाठी अडचणी निर्माण झाल्या, तेव्हा एकनाथ शिंदे यांची ठाकरे कुटुंबाशी जवळीक वाढू लागली.

कामाने विश्वास जिंकला अन् मिळाले तिकीट
२००४ ची विधानसभा निवडणूक ठाण्यातून लढण्यासाठी शिंदे यांना शिवसेनेकडून (Shivsena) तिकीट मिळाले. हे तिकीट केवळ निवडणुकीचे नव्हते, तर हे तिकीट त्यांचा राजकीय प्रवास यशस्वी करण्यासाठी होते. २००४ मध्ये त्यांनी ठाण्यातून निवडणूक जिंकली होती. त्यानंतर २००९ मध्येही निवडणूक जिंकली. त्यांनी २०१४ आणि २०१९ मध्येही विजयाची अशीच कहाणी सुरु ठेवली. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये ते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्रीही राहिले आहेत.राजकारणी जेव्हा उंचावतात तेव्हा गुन्हेगारी प्रकरणेही पाठ सोडत नाहीत. एकनाथ शिंदे यांच्यावर १८ गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडे ११ कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे. यामध्ये २.१० कोटींची जंगम मालमत्ता आणि ९.४५ कोटींची स्थावर मालमत्ता जाहीर करण्यात आली.

शिंदे यांच्या नेतृत्वावर बंडखोरांचा विश्वास
शिंदे यांच्यातील नेतृत्वगुण हा त्यांचा यूएसपी आहे.किंबहुना त्यांनी रस्त्यावरून सत्तेपर्यंतचा संघर्ष पाहिला आहे. नेतृत्वाच्या या गुणांमुळे शिंदे यांनी ठाकरे सरकारमधून बाहेर पडले आपल्या उद्दिष्टात नक्कीच यश येईल, असा विश्वास बंडखोर आमदारांना वाटत होता. यामुळेच एक एक करून अनेक आमदार सुरतमार्गे गुवाहाटीला पोहोचले होते. आता ते भारतीय जनता पार्टीच्या (BJP) पाठिंब्यावर मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या नेतृत्वातील सरकारला जून २०२३ मध्ये एक वर्ष पूर्ण होईल. सरकारच्या सात महिन्यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांनी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube