मतदारसंघात फक्त 59 लाख खर्च; ठाकरेंचे विश्वासू खासदार अनिल देसाईंचे रिपोर्ट कार्ड काय? 

MP Anil Desai : राज्यातील राजकारणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सध्या चर्चेत आहे. या पक्षातील सहा खासदारांनी ऑपरेशन टायगर अंतर्गत

MP Anil Desai

MP Anil Desai : राज्यातील राजकारणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सध्या चर्चेत आहे. या पक्षातील सहा खासदारांनी ऑपरेशन टायगर अंतर्गत पक्षाची साथ सोडत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का दिला आहे.  तर दुसरीकडे मतदारसंघात विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया सहा खासदारांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे विरोधी खासदारांना विकासकामांसाठी निधी दिला जात नसल्याची चर्चा आता जोराने राजकीय वर्तुळात सुरु असताना खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधी (MPLADS) खर्चाबाबत आकडेवारी समोर आली आहे.

या आकडेवारीनुसार उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडणाऱ्या सहा खासदारांसह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मुंबई दक्षिण मध्यचे खासदार अनिल देसाई यांनी देखील निधीचा विकासकामासाठी उपयोग केला नसल्याची माहिती समोर आली आहे.

Empowered Indian MP Performance Report नुसार अनिल देसाई यांनी उपलब्ध झालेल्या 14.7 कोटी रुपयांच्या निधीपैकी फक्त 59 लाख रुपये खर्च केले असून या निधी वापराचा दर अवघ्या 4 टक्के आहे. लोकसभा निवडणुकीला जवळपास 2 वर्ष पूर्ण झाले असून आतापर्यंत खासदार अनिल देसाई यांनी विकास निधीचा वापर फक्त 4 टक्के केल्याने अनिल देसाई मतदारसंघात विकासकामे कधी करणार याबाबत आता मतदारराजा प्रश्न विचारत आहे.

या अहवालानुसार अपूर्ण असलेल्या प्रमुख कामांमध्ये गटारे व पदचारी मार्गांचे बांधकाम, चेकरड लादी बसविणे, पेव्हर ब्लॉक टाकणे आणि जेष्ठ नागरिकांसाठी कट्ट्यांचे बांधकाम यांचा समावेश आहे. अनिल देसाई यांच्याकडून या कामांसाठी सप्टेंबर 2025 मध्ये 20 ते 25 लाख रुपयांच्या निधीची शिफारस करण्यात आली होती.

या अहवालानुसार, खासदार अनिल देसाई यांनी आपल्या मतदारसंघासाठी 34 विकासकामांची शिफारास केली असून आतापर्यंत एकही काम पूर्ण झालेली नाही. त्यामुळे पूर्ण 34 कामे प्रलंबित असून त्यांना मिळालेला 14.1 कोटी रुपयांचा निधी पडून आहे.

अनिल देसाई लोकसभा निवडणूक निकाल

2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अनिल देसाई यांचा 53, 348 मतांनी विजय झाला होता. या निवडणुकीत त्यांनी शिंदे गटाचे राहुल शेवाळेंना पराभव करत बाजी मारली होती. राहुल शेवाळेंना 3 लाख 41 हजार 754 मते मिळाली होती तर अनिल देसाई यांना 3 लाख 95 हजार 138 मते मिळाली होती.

Empowered Indian MP Performance Report पाहण्यासाठी क्लिक करा 

https://empoweredindian.in/mplads/mps/anil-yeshwant-desai-mumbai-south-central-maharashtra-18th-lok-sabha

follow us