जे पाहिलंस ते विसर, नाहीतर तुलाही… केतन अग्रवाल प्रकरणात प्रत्यक्षदर्शीच्या जबाबातून धक्कादायक दावा
प्रत्यक्षदर्शीलाच तू शांत बस, नाहीतर तुलाही किल्ल्यावरून असाच फेकून देईन, अशी धमकी दिल्याचा दावा त्याने पोलिसांकडे केल्याची माहिती आहे.
Eyewitness in Ketan Agrawal case threatened : लोहगडाच्या कड्यावर नेमकं काय घडलं आणि केतन अग्रवाल दरीत कसा कोसळला, या प्रश्नांची उत्तरं शोधताना पोलिसांच्या तपासात आता दोन महत्त्वाचे धागे समोर आल्याची माहिती आहे. एकीकडे केतनला दरीच्या दिशेने ढकलल्याचं पाहिल्याचा दावा करणाऱ्या प्रत्यक्षदर्शीचा जबाब, तर दुसरीकडे तब्बल 12 टीबी डिजिटल डेटामधून मिळालेली माहिती तपासासाठी महत्त्वाची ठरत असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे, घटना पाहिल्यानंतर याबाबत विचारणा करणाऱ्या प्रत्यक्षदर्शीलाच तू शांत बस, नाहीतर तुलाही किल्ल्यावरून असाच फेकून देईन, अशी धमकी दिल्याचा दावा त्याने पोलिसांकडे केल्याची माहिती आहे.
तपासातील सूत्रांच्या माहितीनुसार, 23 जून रोजी एका प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना जबाब दिला. गड चढत असताना त्याने केतन आणि सियाला एकत्र पाहिलं होतं, तर त्यांच्या मागून चेतन येत होता. उन्हाळ्याचे दिवस असूनही चेतनने हुडी घातल्यामुळे इतक्या उन्हात हुडी का घातली आहे? अशी विचारणा प्रत्यक्षदर्शीने त्याला केली होती. त्यामुळे चेतनचा चेहरा आपल्या लक्षात राहिल्याचं त्याने पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे. त्यानंतर गडावर पुढे गेल्यावर हा प्रत्यक्षदर्शी काही काळ आपल्या मित्रांपासून बाजूला गेला. पुन्हा पुढे जात असताना त्याचं लक्ष सियाकडे गेलं. सियाने बोटाने चेतनच्या दिशेने इशारा केला आणि त्यानंतर ती खाली बसली, असं त्याने जबाबात सांगितल्याची माहिती आहे. याचवेळी सियाने केतनच्या पायावर लाथ मारल्याचा आणि त्याच क्षणी चेतन मागून धावत येऊन केतनला दरीच्या दिशेने ढकलल्याचा दावा या प्रत्यक्षदर्शीने केला आहे.
घटनेनंतर प्रत्यक्षदर्शीने चेतनला याबाबत विचारणा केली असता, तू शांत बस, नाहीतर तुलाही किल्ल्यावरून असाच फेकून देईन, अशी धमकी आपल्याला देण्यात आल्याचा दावाही त्याने पोलिसांकडे केला आहे. या कथित धमकीमुळे आपण प्रचंड घाबरलो आणि त्या वेळी मित्रांनाही काही सांगितलं नाही, असं त्याने म्हटल्याची माहिती आहे. घरी परतल्यानंतर त्याची तब्येत बिघडल्याने काही दिवस तो घरातच राहिला. मात्र माध्यमांमधून या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर त्याने पोलिसांशी संपर्क साधल्याचं सांगितलं जात आहे.
मनोज जरांगेंच्या कोअर कमिटीतील सदस्य अडचणीत, कोट्यवधींचा वाळू दंड वसूल करण्याचे आदेश
दुसरीकडे, या प्रकरणाच्या तपासात पोलिसांच्या हाती तब्बल 12 टीबी तांत्रिक डेटा लागल्याची माहिती आहे. सहा मोबाईल, नऊ पेनड्राइव्ह, बॅकअप डेटा, कॉल रेकॉर्ड, सोशल मीडिया अकाउंट्स आणि डिलीट करण्यात आलेल्या चॅट्सचा फॉरेन्सिक तपास करण्यात आल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. डिलीट करण्यात आलेल्या डेटापैकी काही माहिती पुन्हा मिळवण्यात तपास यंत्रणेला यश आल्याचाही दावा करण्यात आला आहे. मोबाईलमधील डेटा कायमस्वरूपी कसा डिलीट करायचा, चॅट हिस्टरी कशी हटवायची आणि डिलीट केलेला डेटा पुन्हा मिळू नये यासाठी काय करता येईल, यासंदर्भात इंटरनेटवर सर्च करण्यात आल्याचं तपासात आढळल्याचा दावा पोलिस सूत्रांनी केला आहे. इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, स्नॅपचॅट आणि चॅटजीपीटीसह विविध डिजिटल माध्यमांवरील हालचालींचीही तपासणी करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. सियाने घरात लपवून ठेवलेला दुसरा मोबाईल फोडल्याची माहितीही तपासात समोर आल्याचा दावा आहे. मात्र संबंधित बॅकअपमधून काही माहिती मिळवण्यात तपास यंत्रणेला यश आल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
कथित कटासंदर्भातील संभाषणात कोणत्याही विशेष कोडवर्डचा वापर झाल्याचं आढळलं नसल्याची माहिती आहे. उलट, उपलब्ध डिजिटल डेटामध्ये काही महत्त्वाच्या बाबींवर थेट भाषेत चर्चा झाल्याचा दावा तपासातील सूत्रांनी केला आहे. रितेश हंगेच्या मोबाईलमधून मिळालेल्या कथित डिलीट चॅट्समध्ये सिया आणि चेतनसोबत झालेल्या संभाषणाशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळाल्याचंही सूत्रांचं म्हणणं आहे. तिघांचे कॉल डिटेल रेकॉर्ड, सोशल मीडिया अकाउंट्स आणि डिजिटल बॅकअपचीही पोलिसांकडून पडताळणी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या संवाद मेळाव्यात आमदार सुरेश धस यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचा जाणता राजा म्हणून उल्लेख
घटनेनंतरही पोलिसांच्या तपासापासून कसं वाचता येईल आणि तपास प्रक्रियेत कोणत्या प्रकारच्या चुका होऊ शकतात, अशा स्वरूपाची माहिती इंटरनेटवर शोधण्यात आल्याचा दावा तपासातून करण्यात आला आहे. काही चित्रपट, डिजिटल कंटेंट आणि परदेशी पॉडकास्टमधूनही संबंधित माहिती घेतल्याचा तपास यंत्रणेचा दावा असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे एका बाजूला प्रत्यक्षदर्शीचा जबाब आणि त्याला दिलेल्या कथित धमकीचा दावा, तर दुसऱ्या बाजूला 12 टीबी डिजिटल डेटा, सहा मोबाईल, नऊ पेनड्राइव्ह, डिलीट चॅट्स, कॉल रेकॉर्ड आणि सोशल मीडिया हालचाली अशा विविध धाग्यांची एकमेकांशी सांगड घालण्याचं काम तपास यंत्रणेकडून सुरू आहे. केतन अग्रवाल प्रकरणात समोर आलेले हे सर्व दावे सध्या तपासाचा भाग असून, प्रत्यक्षदर्शीचा जबाब आणि डिजिटल पुराव्यांच्या पडताळणीनंतर या प्रकरणातील घटनाक्रमाबाबत अधिक स्पष्टता येणार आहे.