राज्यभरात कॉस्मेटिक्स उत्पादकांवर FDAचा बडगा; 34 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

राज्यभरात विविध ठिकाणी करण्यात आलेल्या छापेमारीत तब्बल 34  लाख 61 हजार रुपयांच्या सौंदर्यप्रसाधनांच्या साठ्यावर कारवाई करण्यात आली आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 95

FDA raids cosmetics manufacturers : बेकायदेशीर औषधांविरोधातील राज्यव्यापी मोहिमेनंतर आता अन्न व औषध प्रशासनाने मिसब्रँडेड आणि विनापरवाना सौंदर्यप्रसाधनांविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. ठिकणी करण्यात आलेय छापेमारीत तब्बल 34  लाख 61 हजार रुपयांच्या सौंदर्यप्रसाधनांच्या साठ्यावर कारवाई करण्यात आली आहे. ग्राहकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी करण्यात आलेल्या या कारवाईत साताऱ्यातील कराड, मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट आणि कांदिवली परिसरातील आस्थापनांच्या समावेश आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे 12 जून रोजी सातारा जिल्ह्यातील कराड येथे राजलक्ष्मी टेलिकम्युनिकेशन या आस्थापनाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान विविध सौंदर्यप्रसाधनांचा मोठा साठा आढळून आला. उत्पादनांची पडताळणी केली असता अनेक उत्पादनांच्या वाह्य पॅकिंगवर बॅच क्रमांक आणि उत्पादन दिनांक नमूद असताना देखील बाटल्यांवरील लेबलवर बॅच क्रमांक, उत्पादन दिनांक तसेच उत्पादकाची माहिती नसल्याचे निदर्शनास आले. काही उत्पादनांवर उत्पादन परवाना क्रमांक नमूद असला तरी उत्पादकाची माहिती उपलब्ध नव्हती. त्यामुळे ही उत्पादने प्रथमदर्शनी मिसब्रँडेड असल्याचे आढळून आले. या प्रकरणात 29 लाख 45 हजार 375 रुपयांचा साठा प्रतिबंधित करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

माझ्या नावाने जर कुणी पैसे मागत असेल, तर मी राजीनामा देईन, सरपंचांच्या तक्रारीनंतर पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य

यानंतर 13 जून रोजी मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरातील ब्युटी सेंटर या आस्थापनावर कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान काही सौंदर्यप्रसाधनांवर आवश्यक वैधानिक तपशील नसल्याचे तसेच ग्राहकांची दिशाभूल करणारे दावे करण्यात आल्याचे आढळले. यामध्ये ब्रेस्ट एन्लार्जमेंट, बट एन्हान्समेंट, फॅट बर्नर आणि इतर सौंदर्यवर्धक उत्पादनांचा समावेश होता. या कारवाईत एक लाख 20 हजार 152 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

दरम्यान, मुंबईतील कांदिवली पश्चिम येथे रेडियंट क्रिएशन्स या संस्थेवर देखील धाड टाकण्यात आली. तपासणीत आवश्यक वैध परवान्याशिवाय सौंदर्यप्रसाधनांचे उत्पादन आणि विक्रीसाठी साठवणूक सुरू असल्याचे उघड झाले. याठिकाणी उत्पादन प्रक्रियेसाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री, कच्चा माल आणि तयार उत्पादने देखील आढळून आली. या कारवाईत औषधे, सौंदर्यप्रसाधने, कच्चा माल आणि उत्पादनासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री असा एकूण 3 लाख 96 हजार 830 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांविरोधात औषधे आणि सौंदर्यप्रसाधने अधिनियम 1940 अंतर्गत पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

या कार्रवाईनंतर अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जनतेच्या आरोग्याशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांविरोधात शून्य सहनशीलतेची धोरण कायम ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. भ्रामक, निकृष्ट दर्जाची अथवा विनापरवाना उत्पादने तयार करणे, साठवणे किंवा विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण आणि सुरक्षित उत्पादनांची उपलब्धता सुनिश्चित करणे हेच प्रशासनाचे प्रमुख उद्दीष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

follow us