गंगाधर सत्वधर यांना वाचक पुरस्कार जाहीर; रविवारी पुरस्कार वितरण, डॉ. दीपक पवार यांचे व्याख्यान

Reader Award : दररोज वाचन करणारे आणि स्वतःच्या अर्थार्जनातून ज्ञानदीप ग्रंथालय व सत्यशोधक ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचन वृद्धीसाठी प्रयत्न

Reader Award

Reader Award : दररोज वाचन करणारे आणि स्वतःच्या अर्थार्जनातून ज्ञानदीप ग्रंथालय व सत्यशोधक ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचन वृद्धीसाठी प्रयत्न करणारे गंगाधर सत्वधर यांना विवेकवसा फाउंडेशनच्यावतीने ‘सुगावा’कार प्रा. विलास वाघ स्मृती प्रित्यर्थ वाचक पुरस्कार २०२६ जाहीर झाला आहे, अशी माहिती विवेकवसा फाउंडेशनचे संघटक विशाल विमल यांनी दिली.

जागतिक पुस्तक दिनानिमित्त रविवार, २६ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पुण्यातील एस एम जोशी सभागृह येथे वाचक पुरस्काराचे वितरण होणार आहे. हिंदी भाषा सक्ती विरोधी आंदोलनाचे नेते, मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख डॉ. दीपक पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे. पाच हजार रुपये, मानपत्र, पुस्तके आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी सत्वधर यांची मुलाखत होणार असून दीपक पवार यांचे ‘वाचन, मराठी आणि महाराष्ट्र’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

गंगाधर सत्वधर हे मूळचे परभणी जिल्ह्यातील असून खाजगी नोकरीनिमित्त ते सोळा वर्षापासून चिंचवड येथे राहतात. रोज नित्यनेमाने ते वाचन करतात, लोकांना पुस्तके भेट देतात आणि स्वकमाईतून ग्रंथालये चालवतात. त्यासाठी त्यांनी आजवर किमान दहा लाख रुपयांहून अधिक रक्कम खर्च केली आहे. सत्वधर हे वाचन संस्कृतीची जोपासना करून ती वृद्धिंगत करत आहे, त्यामुळे त्यांना वाचक पुरस्कार देण्यात येत आहे. डॉ. दीपक पवार हे ख्यातनाम वक्ते आहेत. ते मराठी शाळा बचाव मोहीम, हिंदी भाषा सक्तीविरोधी आंदोलन आणि मराठी अभ्यास केंद्राच्या माध्यमातून मराठी भाषा आणि महाराष्ट्र धर्मासाठी काम करत आहेत. त्यामुळे या पुरस्कार वितरणासाठी ते उचित पाहुणे आहेत.

नोकराचं कर्ज फेडलं अन् माणुसकी दाखवली पण त्याच नोकरानं केली IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या

वाचकाला पुरस्कार कशासाठी ?

वाचन संस्कृती लयास चालली आहे, वाचन वाढले पाहिजे, असे सतत बोलले जाते. मात्र वाचन वाढीसाठी प्रोत्साहन देणारे फार काही घडत नाही. वाचन हे दिशादर्शक आणि महत्वाचे असून ती सन्मानाची गोष्ट आहे. हे समाजाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आणि वाचनाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी म्हणून दररोज वाचन करणाऱ्या आणि वाचन चळवळ वृध्दिंगत करणाऱ्या वाचकाला वाचक पुरस्कार देण्याची कल्पना आहे, असे विशाल विमल यांनी सांगितले.

follow us