स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात 11 ऑगस्टला भव्य तिरंगा गौरव यात्रा; मुख्यमंत्री फडणवीस राहणार उपस्थित

देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि तिरंग्याविषयीचा अभिमान जनमानसात अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने या भव्य रॅलीचे आयोजन.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design (20)

Grand Tricolor Gaurav Yatra : स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाची रंगत वाढू लागली असताना पुण्यात येत्या 11 ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तिरंगा गौरव समिती, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या यात्रेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण प्रमुख उपस्थित राहणार आहेत. देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि तिरंग्याविषयीचा अभिमान जनमानसात अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने या भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

या यात्रेच्या पूर्वतयारीसंदर्भात आज महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. बैठकीत रॅलीचा मार्ग, नागरिकांचा सहभाग, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा नियोजन, स्वयंसेवकांच्या जबाबदाऱ्या तसेच कार्यक्रमाचे एकूण व्यवस्थापन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यात्रेचे नियोजन सुरळीत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावे यासाठी विविध समित्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली.

यावेळी बोलताना तिरंगा यात्रा आयोजन समितीचे प्रमुख धीरज घाटे यांनी या यात्रेबाबतची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, तिरंगा गौरव यात्रेत मोठ्या संख्येने नागरिक, युवक-युवती, महिला, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि देशप्रेमी सहभागी होणार आहेत. पुणेकरांचा तिरंग्याविषयी असलेला अभिमान, राष्ट्रनिष्ठा आणि देशभक्ती या यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण राज्याला पाहायला मिळेल. ही यात्रा केवळ रॅली नसून राष्ट्रभक्तीचा उत्सव ठरणार आहे.

2 हजारांवरील UPI व्यवहारांवर MDRची चर्चा, पण ग्राहकांना घाबरण्याचे कारण नाही; सरकारचे स्पष्टीकरण

यात्रेत सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या हातात तिरंगा ध्वज असणार असून देशभक्तीपर घोषणांनी आणि राष्ट्रगीतांच्या सुरांनी संपूर्ण परिसर दुमदुमून जाण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या बैठकीला राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, आमदार भीमराव तापकीर, योगेश टिळेकर, सिद्धार्थ शिरोळे, राज्याचे माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी आमदार जगदीश मुळीक यांच्यासह भाजपचे शहर पदाधिकारी, नगरसेवक, सरचिटणीस, मंडलाध्यक्ष आणि विविध आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तिरंगा गौरव यात्रा 11 ऑगस्ट रोजी दुपारी 3.30 वाजता फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील ललित महाल हॉटेल परिसरातून सुरू होणार आहे. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत यात्रा डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरात पोहोचेल. तेथे यात्रेचा समारोप होणार आहे. या यात्रेत हजारो पुणेकर सहभागी होतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला असून स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात देशभक्तीचे अनोखे वातावरण निर्माण होणार असल्याचे चित्र आहे.

follow us