शरद पवारांच्या नातवांत रंगला सामना; रोहित पवार जिंकले

शरद पवारांच्या नातवांत रंगला सामना; रोहित पवार जिंकले

पुणे : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर पार पडलेल्या कमिटीच्या बैठकीत त्यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अध्यक्षपदाची लढत ही शरद पवार यांच्या नातवांमध्ये झाली. या लढतीत रोहित पवार यांनी बाजी मारली.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यपदाच्या निवडणुकीत रोहित पवार यांचा संलग्न क्लब गटाकडून विजय झाला. रोहित पवार यांना असोसिएशनच्या बैठकीत सर्वप्रथम एमसीएच्या 16 सदस्यीय समितीत सामील केले गेले आणि नंतर असोसिएशनचे अध्यक्षपद ही सोपवण्यात आले.

शरद पवार यांच्यानंतर आता रोहित पवार हे त्यांच्या कुटुंबातील दुसरी सदस्य आहेत, ज्यांची एमसीए अध्यक्षपदी निवड झाली आहे. रोहित पवार यांच्यासोबतच उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. दरम्यान, सचिवपदी शुभेंद्र भांडारकर, खजिनदारपदी सांगलीचे संजय बजाज आणि सह सचिव संतोष बोबडे यांची निवड करण्यात आली आहे.

निवडणुकीचे विशेष
या निवडणुकीत आमदार रोहित पवार (शरद पवार यांचे ज्येष्ठ बंधू आप्पासाहेब पवार यांचे नातू) आणि अभिषेक बोके (पवार यांच्या भगिनीचे नातू) यांच्याबरोबरच माजी क्रिकेटपटू शंतनू सुगवेकर आणि सुनील संपतलाल मुथा यांनी अर्ज दाखल केले होते.

ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करण्यात आले. मात्र हा प्रयत्न फसला व अखेर निवडणूक झाली. त्यामध्ये रोहित पवार आणि ‘मुथा यांना क्लब’ वर्गातून सर्वाधिक 22 मात्र पडली. मुथा यांना 21 मते पडली. बोके यांना 3, तर सुगवेकर यांना 2 मतांवर समाधान मानावे लागले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube