“तुरुंगात मलाही मारण्याचा प्रयत्न झाला”, संजय राऊतांच्या आरोपांवर हेमंत देसाईंची प्रतिक्रिया; म्हणाले…

“तुरुंगात मलाही मारण्याचा प्रयत्न झाला”, संजय राऊतांच्या आरोपांवर हेमंत देसाईंची प्रतिक्रिया; म्हणाले…

पुणे : तुरुंगात मलाही मारण्याचा प्रयत्न झाला होता, असा सणसणाटी आरोप आज खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेतच केला. हा आरोप खूपच गंभीर आहे. तुरुंगातच जर कोणाच्याही जीविताला धोका निर्माण होत असेल, तर ती अत्यंत गंभीर गोष्ट आहे. अशी प्रतिक्रिया हेमंत देसाईं (Hemant Desai ) यांनी यावेळी दिली.

एका राजकीय नेता- पत्रकारास टार्गेट केले गेले असेल, तर ती आणखीनच भयंकर गोष्ट मानावी लागेल. उद्या विरोधी नेत्यांना तुरुंगात डांबूनही सत्ताधार्‍यांचे समाधान होत नसेल आणि ते जर अशा ‘नकोशा’ वाटणाऱ्या नेत्यांना संपवून टाकणार असतील, तर हे अत्यंत धोकादायक आहे. मुख्यमंत्री (CM) व उपमुख्यमंत्री- गृहमंत्री (Deputy Chief Minister) यांनी या गोष्टीची या आरोपाची गंभीर दखल घेतली पाहिजे. राऊतांनी रितसर तक्रार दाखल करावी, मग चौकशी करू, असा पवित्रा सरकारने घेऊ नये.

संजय राऊतांनी राज्यसभा अध्यक्षांना यासंबंधी पत्र लिहून या प्रकरणाची माहिती दिली पाहिजे. उद्धव ठाकरे यांचा मला कोणत्या ना कोणत्या प्रकरणात अडकवून तुरुंगात टाकण्याचा डाव होता, असा आरोप फडणवीस यांनी अलीकडेच केला होता. पण इथे तर तुरुंगात पद्धतशीरपणे ज्या व्यक्तीला डांबले, त्याला जिवे मारण्याचा कथित प्रकार होत असेल, तर त्याची चौकशी व्हायला नको ? काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील संजय राऊतांबाबत असा प्रकार घडला असेल, तर त्याबद्दल जोरदार आवाज उठवला पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत

“माझ्यासारख्या माणासाला तुरुंगात पाठवलं. मलाही आतमध्ये जवळजवळ मारण्याचाच प्रयत्न करण्यात येत होता. याविषयी सर्वांनाच माहिती आहे. मी यावर योग्य वेळी बोलणार आहे, असे विधान संजय राऊत यांनी केले. तसेच तुम्हाला माणासं संपवण्यासाठी सत्तेवर आणले आहे का ? शशिकांत वारिशे यांनी तुमचे काय वाकडे केले होते ? वारिशे यांच्या आईचा आक्रोश मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी, येथील पालकमंत्र्यांनी येऊन पाहावा. हे महाराष्ट्रात चालणार नाही. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube