पुणे तिथे काय उणे! उमेदवाराने अर्ज शुल्क म्हणून भरली 5 हजार रुपयांची चिल्लर
पुण्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या उमेदवाराने अर्ज शुल्क भरण्यासाठी थेट पाच हजार रुपयांची चिल्लर आणली.
In Pune, a candidate paid a chilling sum of Rs 5,000 as application fee : राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका निवडणुकांची घोषणा केल्यानंतर राज्यभरात राजकीय वातावरण तापलं आहे. उमेदवारांची धावपळ सुरू असून, इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक कार्यालयांकडे गर्दी केली आहे. अनेक पक्षांनी आपले अधिकृत उमेदवार जाहीर केले असून, काही अपक्ष उमेदवारही जोरदार तयारीत उतरले आहेत. मात्र या सगळ्या गडबडीत पुण्यातून(Pune) एक असा प्रकार समोर आला आहे, जो सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरतो आहे.
पुण्यातील एका प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या उमेदवाराने अर्ज शुल्क भरण्यासाठी थेट पाच हजार रुपयांची चिल्लर आणली. ही चिल्लर म्हणजे सुटे पैसे, नाण्यांच्या पिशव्या आणि भरलेल्या पॅकेट्स. उमेदवाराने रोख रक्कम देण्याऐवजी संपूर्ण रक्कम नाण्यांच्या स्वरूपातच सादर केल्याने निवडणूक कार्यालयात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. एसी असलेल्या निवडणूक कार्यालयात बसून ही नाणी मोजताना अधिकाऱ्यांना अक्षरशः घाम फुटला. टेबलावर ढिगाने नाणी, त्यांची मोजदाद, पुन्हा पडताळणी आणि रक्कम पूर्ण होते की नाही याची खात्री करताना कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. काही वेळासाठी कार्यालयातील इतर कामकाजही ठप्प झाल्याचं पाहायला मिळालं.
या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. “पुणे तिथे काय उणे” या म्हणीचा प्रत्यय देणारा हा प्रकार असल्याची प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. काही जणांनी याला उमेदवाराचा हा प्रकार म्हणजे प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट असल्याची टीकाही केली आहे. दरम्यान, निवडणूक नियमांनुसार उमेदवारी अर्ज शुल्क रोख रक्कमेत स्वीकारलं जातं आणि ती रक्कम नाण्यांच्या स्वरूपात देण्यावर कोणतीही बंदी नसल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना नाणी स्वीकारावीच लागली.
महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात दररोज वेगवेगळ्या घडामोडी समोर येत आहेत. कुठे पक्षांतर, कुठे बंडखोरी, तर कुठे अशा अनोख्या घटना. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस असल्याने पुढील काही तासांत आणखी काय काय पाहायला मिळणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
