वय वाढेल तसे काही पुढारी अधिकच वेड्यासारखे वागतात, इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य चर्चेचा विषय

ज्येष्ठ नेत्यांनी वयाच्या 60 वर्षांनंतर सक्रिय राजकारणातून निवृत्त व्हावे, असे मत त्यांनी व्यक्त केले असून या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 10 08T110440.351

Indurikar Maharaj’s statement sparks discussion : आपल्या खास शैलीतील कीर्तन, विनोदी उदाहरणे आणि समाजप्रबोधनपर भाषणांमुळे कायम चर्चेत असलेले हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहेत. विविध सामाजिक विषयांवर परखड भाष्य करणारे इंदुरीकर महाराज यावेळी थेट राजकीय व्यवस्थेवर बोलले. राजकारणातील ज्येष्ठ नेत्यांनी वयाच्या 60 वर्षांनंतर सक्रिय राजकारणातून निवृत्त व्हावे, असे मत त्यांनी व्यक्त केले असून त्यांच्या या वक्तव्याची राज्यभर चर्चा रंगली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव येथे आयोजित कीर्तनात बोलताना इंदुरीकर महाराजांनी राजकारणातील निवृत्तीच्या वयोमर्यादेचा मुद्दा उपस्थित केला. सरकारी कर्मचारी, अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीचे ठरावीक वय असते. मात्र, देशातील आणि राज्यातील राजकारणात अशी कोणतीही व्यवस्था नसल्याने अनेक नेते वयोमानाच्या उत्तरार्धातही महत्त्वाच्या पदांवर कायम राहतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

राजकारणात प्रवेश करण्यासाठी 18, 21 आणि 25 वर्षांच्या वयोमर्यादा ठरवण्यात आल्या आहेत. मात्र, राजकारणातून निवृत्ती घेण्यासाठी कोणतीही अट नाही. त्यामुळे अनेक नेते 80-90 वर्षांचे झाल्यानंतरही पक्ष संघटना, सरकार किंवा महत्त्वाच्या राजकीय पदांवर कायम दिसतात. माझ्या मते, पुढाऱ्यांनी 60 वर्षांनंतर थांबायला हवे. त्यांनी स्वेच्छेने जबाबदाऱ्या नव्या पिढीकडे सोपवायला हव्यात, असे इंदुरीकर महाराज म्हणाले.

विश्वनाथ पाटेकर ते नाना पाटेकर… हा प्रवास होता संघर्षातून घडलेल्या एका असामान्य व्यक्तिमत्त्वाचा

यावेळी त्यांनी वय आणि नेतृत्व याविषयीही भाष्य केले. वय वाढत जाते तशी माणसाची शारीरिक आणि बौद्धिक क्षमता काही प्रमाणात कमी होत जाते. पण काही पुढारी मात्र वय वाढेल तसे अधिकच हट्टी आणि आक्रमक होताना दिसतात, असे म्हणत त्यांनी राजकीय नेत्यांवर अप्रत्यक्ष टीका केली. त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्येही मोठी चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले.

इंदुरीकर महाराजांनी तरुणांना राजकारणात संधी मिळण्याच्या मुद्द्यावरही भर दिला. त्यांच्या मते, वरिष्ठ नेते दीर्घकाळ पदांवर राहिल्यामुळे नव्या नेतृत्वाला पुढे येण्यासाठी पुरेशी संधी मिळत नाही. अनेक तरुण कार्यकर्ते वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करत असतात, मात्र निर्णयक्षम पदांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना मोठी प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे अनेकदा पक्षांतर्गत नाराजी, गटबाजी आणि संघर्ष निर्माण होतात.

तरुणाईकडे ऊर्जा आहे, नवीन कल्पना आहेत आणि बदल घडवून आणण्याची क्षमता आहे. त्यांना वेळेत संधी मिळाली पाहिजे. नेतृत्वामध्ये पिढीगत बदल झाला तर राजकारण अधिक गतिमान आणि लोकाभिमुख होऊ शकते, असेही त्यांनी सूचित केले. इंदुरीकर महाराज यापूर्वीही आपल्या कीर्तनांमधून सामाजिक, राजकीय आणि कौटुंबिक विषयांवर भाष्य करत आले आहेत. त्यांच्या वक्तव्यांमुळे अनेकदा वाद निर्माण झाले असले तरी त्यांच्या परखड आणि थेट शैलीमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत. यावेळी राजकीय नेत्यांच्या निवृत्तीचा मुद्दा उपस्थित करून त्यांनी पुन्हा एकदा सार्वजनिक चर्चेला नवा विषय दिला आहे.

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दरम्यान, इंदुरीकर महाराजांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून त्यावर समर्थन आणि विरोध अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी नव्या नेतृत्वाला संधी देण्यासाठी अशा प्रकारच्या मर्यादेची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे, तर काहींनी अनुभवाला वयाची मर्यादा नसते, असे म्हणत या भूमिकेशी असहमती दर्शवली आहे. आता त्यांच्या या विधानावर विविध राजकीय पक्षांचे नेते आणि ज्येष्ठ राजकारणी काय प्रतिक्रिया देतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

follow us