पुण्यातील उमेदवार का मागे घेतला? कोणाच्या परवानगीने घेतला? जयकुमार गोरेंचे सुप्रिया सुळेंना सवाल

राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर थेट निशाणा साधत उलट सवाल उपस्थित केले आहेत.

  • Written By: Published:
Untitled Design 54

Jayakumar Gore’s question to Supriya Sule : विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्याने राज्याच्या राजकारणात घोडेबाजाराच्या चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार झाल्याचा आरोप केला होता. मात्र, या आरोपांना आता सत्ताधारी महायुतीकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर थेट निशाणा साधत उलट सवाल उपस्थित केले आहेत.

पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना जयकुमार गोरे म्हणाले, विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने मोठा घोडेबाजार झाल्याचं सांगणाऱ्या आणि मला तोंड उघडायला लावू नका असं म्हणणाऱ्या सुप्रिया सुळे यांचे तोंड बंद कधी होते? पुण्यातील उमेदवार त्यांनी का आणि कोणाच्या परवानगीने मागे घेतला? पुण्यात कितीचा घोडेबाजार झाला, याचं उत्तर त्यांनी द्यावं. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीतील उमेदवारी माघारीच्या मुद्द्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नवा वाद रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.

गुन्हेगारी, विषारी दारू आणि आता रेव्ह पार्टी; पुण्याच्या कायदा-सुव्यवस्थेबाबत पुन्हा निर्माण झाले गंभीर प्रश्न

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी यापूर्वी विधान परिषद निवडणुकीत मोठा घोडेबाजार झाल्याचा आरोप करत भाजपवर निशाणा साधला होता. भारतीय जनता पक्षाने मला तोंड उघडायला लावू नये. विधान परिषद निवडणुकीत जो काही घोडेबाजार झाला, त्याबाबत अनेक गोष्टी सर्वांनाच माहिती आहेत. कोणत्याही निवडणुकीत पैशांच्या जोरावर किंवा केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावाखाली राजकारण होऊ नये. घोडेबाजार थांबवण्यासाठी मी संसदेत विधेयक मांडणार आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली होती.

याचवेळी जयकुमार गोरे यांनी आमदार रोहित पवार यांच्या प्रस्तावित अन्नत्याग आंदोलनावरही टीका केली. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी रोहित पवार 12 जूनपासून पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. मात्र, राज्यात आधीच कर्जमाफी झाली असून रोहित पवारांना त्याची माहिती नसल्याचा दावा जयकुमार गोरे यांनी केला. राज्यात कर्जमाफी झाली हे रोहित पवारांना माहिती नाही. ते सध्या विमानाने दिल्ली वारी करण्यात व्यस्त असतात. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती नसल्याने ते अन्नत्याग आंदोलनाची घोषणा करत आहेत, असा टोला गोरेंनी लगावला.

विधान परिषद निवडणुकीतील कथित घोडेबाजाराच्या आरोपांवरून आणि शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोपांची लढाई आणखी तीव्र होत असून, आगामी काळात हा राजकीय संघर्ष अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

follow us