भोंदू बाबा अशोक खरातच्या पत्नीला न्यायालयाचा दिलासा; एक लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

सिन्नर पोलीस ठाण्यात दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यात नाशिकरोड अतिरिक्त स्तर न्यायालयाने कल्पना खरातच अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 42

Kalpana Kharat granted bail : दैवी शक्तीचा धाक दाखवून जमीन हडप केल्याच्या बहुचर्चित प्रकरणात संशयित भोंदू बाबा अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात हिला मोठा दिलासा मिळाला आहे. सिन्नर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात नाशिकरोड अतिरिक्त स्तर न्यायालयाने कल्पना खरातच अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त स्तर न्यायाधीश केदार कोळंबकर यांनी हा निर्णय देताना काही महत्वपूर्ण निरीक्षणे देखील नोंदवली आहेत. न्यायालयाने कल्पना खरातला एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तितक्याच रकमेचा जामीनदार सादर करण्याच्या अटीवर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. मात्र, तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे स्पष्ट निर्देश देखील न्यायालयाने दिले आहेत.

या प्रकरणातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे कथित जमीन व्यवहार हा 2004 सालचा असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. तक्रारदार शिवराम माली यांनी तब्बल 22 वर्षांनंतर म्हणजे 2026 मध्ये या व्यवहारासंदर्भात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. एवढ्या मोठ्या कालावधीत फिर्यादी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी किंवा जमिनीचा ताबा परत मिळवण्यासाठी कोणतीही दिवाणी कारवाई केली नसल्याची बाब न्यायालयाने विशेषत्वाने नोंदवली.

नसरापूर बलात्कार हत्या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी; 29 जूनला शिक्षा सुनावणार

सुनावणीदरम्यान न्यायालयाने करार करतांना फसवणूक करण्याचा कोणताही अप्रामाणिक हेतू असल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत नसल्याचे स्पष्ट केले. संबंधित जमीन व्यवहार हा नोंदणीकृत दस्तऐवजाद्वारे अधिकृतपणे पार पडलेला असल्याचे देखील न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे हा वाद मूळतः दिवाणी स्वरूपाचा असून त्याला गुन्हेगारी प्रकरणाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न झाल्याचे न्यायालयाच्या निरीक्षणात नमूद करण्यात आले.

न्यायालयाच्या या निर्णयामुळे सिन्नर परिसरात चर्चेत असलेल्या या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. कल्पना खरातला दिलासा मिळाला असला तरी तपास यंत्रणेला सहकार्य करणे तिच्यासाठी बंधनकारक राहणार आहे. दरम्यान, भोंदू बाबा म्हणून चर्चेत असलेल्या अशोक खरातविरोधातील इतर गंभीर प्रकरणांची सुनावणी देखील लवकरच होणार आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असून या प्रकरणांची सुनावणी 7 जुलै रोजी होणार आहे.

Ketan Agrawal Murder : होयं, मला चेतन हवा होता, पण केतनला मी..,; सियाने सगळेचं पत्ते उघडले!

अशोक खरात याच्यावर दैवीशक्ती असल्याचा दावा करून महिला भाविकांची फसवणूक करणे, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणे, आर्थिक गैरव्यवहार करणे, खंडणी उकळणे त्याचप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत विविध गुन्हे दाखल आहेत. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये त्याच्याविरोधात एकूण 17 गुन्ह्यांची नोंद असून त्यापैकी 12 प्रकरणांचा तपास विशेष तपास पथक अर्थात एसआयटीमार्फत केला जात आहे. महिलांवरील अत्याचारही संबंधित आठ गुन्ह्यांमध्ये यापूर्वीच दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

मंगळवारी आरोपीविरोधातील दोन प्रकरणांची सुनावणी होणार होती. मात्र अशोक खरातला न्यायालयात हजर करण्यात न आल्याने ती सुनावणी पुढे ढकलण्यात आली. आता 7 जुलैच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून अशोक खरातविरोधातील गंभीर आरोपांच्या तपासाची दिशा आणि न्यायालयीन प्रक्रियेतील पुढील घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत.

Tags

follow us