मानवाधिकार दिनी लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून जनजागृती; मानवाधिकार पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन
'जागतिक मानवाधिकार दिनाचे' औचित्य साधून "जागर मानवी हक्काचा" विशेष उपक्रमाचे आयोजन. माहिती पत्रकांचे वाटप करून हक्कांची जाणीव करून देणार.
Awareness campaign by law college students : मानवी हक्क हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे, मात्र त्याबद्दलची जागरूकता आजही समाजात कमी आहे. हीच उणीव भरून काढण्यासाठी ‘जागतिक मानवाधिकार दिनाचे’ (World Human Rights Day) औचित्य साधून “जागर मानवी हक्काचा” या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्था, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे (Pune) आणि जाधवर लॉ कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि.10 डिसेंबर रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आयोजक मानवी हक्क संरक्षण व जागृतीचे अध्यक्ष विकास जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूस चे उपाध्यक्ष अॅड. शार्दूल जाधवर आणि मानवी हक्क संरक्षण व जागृतीचे संचालक अण्णा जोगदंड यांनी दिली.
उपक्रमा अंतर्गत शहरातील प्रमुख स्वारगेट चौक येथे दुपारी 3.30वाजता भव्य जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. यामध्ये यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेज, जाधवर लॉ कॉलेज, सूर्यदत्ता लॉ कॉलेज, मॉडर्न लॉ कॉलेज आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज मराठा लॉ कॉलेज येथील शेकडो विद्यार्थी सहभागी होणार आहेत. हे विद्यार्थी हातात मानवी हक्क विषयक पोस्टर्स धरून आणि नागरिकांना माहिती पत्रकांचे वाटप करून हक्कांची जाणीव करून देणार आहेत.
तसेच मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या पद्मजी सभागृहात सायंकाळी 5 वाजता मुख्य सोहळा पार पडणार आहे. यात ‘मानवी हक्क’ या विषयावर तज्ज्ञांचे व्याख्यान आणि ‘मानवाधिकार पुरस्कार’ वितरण सोहळा आयोजित केला आहे. मानवाधिकार क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध संस्थांच्या प्रतिनिधींचा यावेळी सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे.
कार्यक्रमासाठी न्यायदान आणि प्रशासन क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश महेंद्र के. महाजन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश रेवती देशपांडे, निवृत्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. जटाळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुधाकरराव जाधवर, समाजकल्याण विभागाचे सहा. आयुक्त विशाल लोंढे, माजी विशेष पोलीस महानिरीक्षक सुरेश खोपडे आणि डॉ. यामिनी अडबे हे उपस्थित राहणार आहेत. समाजात कायदा आणि मानवाधिकाराप्रती आदर निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल, असे आयोजकांतर्फे सांगण्यात आले.
