‘एसी’ची थंड हवा फोडणार घाम ! परस्पर एसी बसविणारे अधिकारी रडारवर
नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करत आपल्या कार्यालयात ‘एसी’ची (एअर कंडीशनर) थंड हवा खाणाऱ्या अधिकाऱ्यांवर सरकारची वक्रदृष्टी पडली आहे. अधिकारात नसतानाही परस्पर आपल्या दालनात एसी बसविणाऱ्या अशा अधिकाऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश नाशिक विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. याबाबत आयुक्त कार्यालयाने जळगावसह, नगर, नाशिक, धुळे, नंदूरबार जिल्हाधिकाऱ्यांना पत्र धाडले आहे. आयुक्तांनीही या प्रकाराची दखल घेतल्याने अधिकाऱ्यांकडून नागरिकांच्या पैशांचा होणारा अयोग्य वापर ऐरणीवर आला आहे.
याबाबत जळगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ते दीपकुमार गुप्ता यांनी 24 फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत विभागीय आयुक्त कार्यालयाने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या पत्रात म्हटले आहे, की सातव्या वेतन आयोगानुसार ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची वेतनश्रेणी 144200-218200 व त्यापेक्षा जास्त आहे अशा अधिकाऱ्यांना त्यांच्या दालनात एअर कंडीशनर बसविण्यास सरकारने मान्यता दिलेली आहे.
‘आदित्य ठाकरे यांचे मानसिक संतुलन बिघडले’
मात्र, ज्या अधिकाऱ्यांचा वेतनस्तर 144200-218200 पेक्षा कमी आहे अशा अधिकाऱ्यांना त्यांच्या दालनात एअर कंडीशनर बसवता येत नाही अशी तक्रार मिळाली आहे.
तरी देखील आपल्या कार्यालयातील काही अधिकाऱ्यांनी एअर कंडीशनर बसवले असतील तर योग्य कार्यवाही करण्यात यावी आणि या कार्यवाहीचा अहवाल कार्यालयास सादर करावा अशा सूचना जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
आयुक्तांनी यासोबतच नाशिक, नगर, धुळे आणि नंदूरबार जिल्हाधिकाऱ्यांनाही पत्र पाठवले आहे. आयुक्तांनी आदेश दिल्यानंतर आता स्थानिक पातळीवर कारवाई होऊन असे प्रकार करणाऱ्या अधिकाऱ्यांना वचक बसणार का, त्यांच्यावर नेमकी काय कारवाई होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.