आज हिवाळी अधिवेशनाचा 9 वा दिवस, अंतिम आठवडा प्रस्ताव सादर करणार
नागपूर : राज्याची उपराजधानी असल्या नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. हिवाळी अधिवेशनाचा आज 9 वा दिवस आहे. आजचं सभागृहात अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. त्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. आजही विरोधक विविध मुद्यावरुन आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जातेय. बुधवारी (दि.28) सभागृहात विविध विषयांवर चर्चा झाली.
गायरान जमीन प्रकरणी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर आरोप झाले. या आरोपांना सत्तारांनी सभागृहात उत्तर दिले. त्याचबरोबर महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक 2022 हे विधानसभेत बहुमताने संमत देखील झाले. लोकायुक्त विधेयक विधीमंडळात ठेवण्यात आले होते. बुधवारी हे विधेयक बहुमताने मंजूर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांचे आभार मानले.
महाराष्ट्र कर्नाटक प्रश्नावरुनही काल सभागृहात वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले. मुंबई केंद्रशासित प्रदेश करा अशी मागणी कर्नाटकच्या मंत्र्यांनी केल्यानंतर बुधवारी त्याचे पडसाद विधानसभेत उमटले. कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री सी एस अश्वथ नारायण यांच्या निर्णयाचा विधानसभेत निषेध करण्यात आला. मुंबई महाराष्ट्राची असून कोणाच्या बापाची नाही, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्र्यांकडे नारायण यांच्या वक्तव्याची तक्रार करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.