Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंच्या कारला धडकला पण, थोडक्यात वाचला
Aditya Thackeray : उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या वाहनाला एक दुचाकीस्वार येऊन धडकला. ही घटना आज दुपारी शिवसेना भवनासमोर घडली. या अपघातात सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही. आदित्य ठाकरे यांच्या वाहनाचे किरकोळ नुकसान झालं आहे.
याबाबत आधिक माहिती अशी, आदित्य ठाकरे शिवसेना भवन येथे येत असताना पाठीमागील बाजूने येत असलेला एक दुचाकीस्वार कारच्या पुढल्या चाकाजवळ धडकला. अचानक घडलेल्या या प्रकाराने धावपळ उडाली. मात्र, यामध्ये दुचाकीस्वाराला कोणतीही दुखापत झाली नाही. ठाकरे शिवसेना भवन येथे आले त्यानंतर त्यांनी शाखाप्रमुखांना दुचाकीस्वाराची विचारपूस करण्यास सांगितले. या ठिकाणी तैनात असणारे वाहतूक पोलिसही धावून आले. त्यांनी दुचाकीस्वाराला बाजूला घेतले आणि आदित्य ठाकरे यांच्या वाहनाला वाट करून दिली.
आज दुपारी मुंबईतील शिवसेना भवन परिसरात एक दुचाकीस्वार आदित्य ठाकरे यांच्या कारला अचानक येऊन धडकला. या प्रकारामुळे परिसरात चांगलीच धावपळ उडाली. #Maharashtra #Mumbai #adityathackeray #ShivsenaUBT @AUThackeray pic.twitter.com/teYPFup5av
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) June 28, 2023
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. राज्य सरकारकडून ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा कमी केल्याच्या बातम्या मध्यंतरी आल्या होत्या. त्यानंतर असा प्रकार घडल्याने चर्चा सुरू झाली. ही घटना घडल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
आदित्य ठाकरे यांची कार उजवीकडे वळत असताना मागील बाजूने ओव्हरटेक करत असलेला दुचाकीस्वार आदित्य यांच्या कारवर धडकला. कार उजवीकडे वळत असताना दुचाकीस्वाराने ब्रेक दाबला त्यावेळी त्याची दुचाकी घसरली आणि कारच्या पुढील चाकावर आदळली.
या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही लोकांनी या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. यामध्ये एक रिक्षावाला आडवा आला नंतर दुचाकीस्वाराने आदित्य ठाकरेंच्या कारला धडक दिली, असे बोलताना ऐकायला येत आहे.