शीतल म्हात्रे मला बहिणीसमान; व्हायरल व्हिडीओप्रकरणी सुर्वे तीन दिवसांनंतर बोलले..

शीतल म्हात्रे मला बहिणीसमान; व्हायरल व्हिडीओप्रकरणी सुर्वे तीन दिवसांनंतर बोलले..

Prakash Surve : वादग्रस्त व्हिडीओ प्रकरणी अखेर तीन दिवसांनंतर आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांनी मौन सोडले आहे. सुर्वे यांनी प्रसारमाध्यमांना निवेदन पाठवत या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच तीन दिवसांनंतर बोलण्याचे कारणही  त्यांनी सांगितले आहे.

या पत्रात त्यांनी हा व्हिडीओ चुकीचा असल्याचे म्हटले आहे. हा व्हिडीओ मॉर्फ करून कुणीतरी त्यात गाणं अपलोड करून विकृतपणा केल्याचे सुर्वे यांनी म्हटले आहे. शीतल म्हात्रे या आपल्याला बहिणीसारख्या आहेत असे स्पष्ट करत विरोधकांना राजकीय नैराश्य आले आहे. माझ्या मतदारसंघात सुरू असलेली विकासकामे त्यांना देखवत नाहीत. त्यामुळेच हा विकृतपणा करण्यात आल्याचा दावा सुर्वे यांनी केला आहे.

राहुल गांधींनी संसदेत माफी मागावी, स्मृती इराणींचा हल्लाबोल

प्रकाश सुर्वे यांचे पत्र..

‘मी गेल्या महिन्याच्या १८ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी पर्यंत माझ्या प्रकृतीच्या कारणामुळे दवाखान्यात दाखल होतो. सध्या मला थ्रोट इंफेक्शनचा त्रास असल्याने व सततचा खोकला असल्याने बोलण्यास त्रास होत आहे. मात्र गेल्या शनिवारी झालेल्या कार्यक्रमानंतर मी काही बोलत नाही असे चुकीचे अर्थ काढून अपप्रचार केल्या जात असल्याने मी हे विस्तृत निवेदन देत आहे.

11 मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यापासून केवळ दहा महिन्यांच्या आत माझ्या मागाठाणे विधानसभा मतदारसंघामधील विविध प्रश्‍न आणि समस्या समजून घेत सर्व प्रश्‍नांवर तोडगा काढत विकासकामांना मंजुरी दिली. कामे पूर्ण करून घेतली. या सोबतच शिंदे यांनी ३० कोटी रूपये मंजूर करून एमएमआरडीएअंर्तगत मुंबई मधील प्रथम सरकता जीना असलेला स्कायवॉक मंजूर केला. हा स्कायवॉक समतानगर ते पोईसर मेट्रो स्टेशनपर्यंत आहे याचा फायदा हजारो नागरिकांना दररोजच्या प्रवासासाठी होणार आहे.

या दोन मोठया प्रकल्पापैकी एकाचे लोकार्पण आणि एकाच भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिनांक 11 मार्च रोजी केले. यावेळी हजारो नागरिक उपस्थित होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. माझ्या संपूर्ण राजकीय जीवनात मी कायम सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविणे आणि त्यांच्यासाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देणे या करिता जीवापाड मेहनत करुन लोकप्रतीनिधी म्हणून प्रशासनासोबत कामांचा पाठपुरवठा करून ती पूर्ण करून लोकसेवेत देणे हे माझे कर्तव्य मानले आहे आणि या कामाच्या जोरावरच आणि जनतेच्या प्रेमामुळेच जनतेने मला दोन वेळा निवडून दिले आहे.

म्हात्रेंमुळे चर्चेत आलेले आमदार प्रकाश सुर्वे नेमके आहेत तरी कोण? जाणून घ्या

सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून माझ्या मतदारसंघात जोमाने सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या धडाक्यामुळे स्वतःच्या राजकीय जीवनात हताश झालेले माझे विरोधक लोकोपयोगी कामे करण्याऐवजी लोकप्रकल्पांच्या कामांपासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्याकरिता व्हिडीओ मोर्फ करणे, खोटे चारित्र्यहनन करणे अशा विकृत गोष्टी करीत आहेत. यामधून त्यांचे राजकीय नैराश्य दिसून येते. सर्वसामान्य लोकांना मात्र त्यांच्यासाठी २४ तास लोकांमध्ये राहून काम करंणारे लोकप्रतिनीधी आवडतात आणि लोक त्यांच्यामागे उभे राहतात हा माझा अनुभव आहे.

Letter 1

11 मार्च रोजी लोकप्रकल्पांच्या उद्घाटनानंतर हजारो लोकांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री शिंदे यांची रॅली झाली. यावेळी गर्दीत आणि मोठ्या आवाजात मला बहिणीसमान असणाऱ्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे मला या कार्यक्रमाबाबत काही सांगत असतानाच्या व्हिडीओमध्ये चुकीचे गाणे टाकून महिलांचा अपमान करण्याच्या विकृत मानसिकतेमधून हा व्हिडीओ सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रसारित केला गेला. अशा प्रकारचे कृत्य हे हा व्हिडीओ बनविणाऱ्यांची महिलांप्रती असलेली मानसिकता दाखवून देतो.

Letter 2

या बनावट व्हिडीओ प्रकरणात मुंबई पोलीसांनी तडफेने कारवाई करत या षडयंत्राबाबत संशयितांना अटक केली आहे त्यामुळे तपासातून याबाबतचे सत्य समोर येईलच. अशाप्रकारचे व्हिडीओ पसरवून लोकांचे लक्ष विचलित करता येईल मात्र लोकांचे मन जिंकण्याकरिता लोकांमध्ये राहून लोकांची कामे करत रहावी लागतात. विरोधक आमच्या कामांमधून लोकांची कामे करण्याची प्रेरणा घेतील अशी मी अपेक्षा करतो. या सर्व प्रकारामुळे माझे कुटुंबीय आणि मला प्रचंड मानसिक त्रास झाला आहे. ज्या कुणी हा व्हिडीओ बनविला असेल त्यांना परमेश्‍वर सदबुद्धी देवो हिच ईश्‍वर चरणी प्रार्थना.

जय महाराष्ट्र

आपला

प्रकाश सुर्वे

आमदार मागाठाणे विधानसभा

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube