पालकांनो लक्ष द्या! शाळा प्रवेशाचे वय टप्प्याटप्प्याने बदलणार; शासनाचा GR निघाला….

Maharashtra School Admission New Age Rules शाळा प्रवेशाच्या वयोमर्यादेत एकसमानता; नव्या नियमांची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

  • Ninad K
  • Written By: Published:
Maharashtra School Admission New Age Rules

Maharashtra School Admission New Age Rules : मुलांच्या शाळा प्रवेशाबाबत राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पूर्व-प्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित करण्यात आले असून, हे नवे निकष टप्प्याटप्प्याने लागू केले जाणार आहेत. हे वय 30 जून रोजी पूर्ण असणे आवश्यक असेल. त्यानुसार, 2027-28 या शैक्षणिक वर्षापासून नर्सरीच्या प्रवेशासाठी बालकाचे वय तीन वर्षे, तर 2030-31 पासून इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी सहा वर्षे पूर्ण असणे आवश्यक असेल. शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे.

कोणत्या वर्गासाठी किती वय आवश्यक?

नव्या निर्णयानुसार बालवाटिका-1 अथवा नर्सरीच्या प्रवेशासाठी तीन वर्षे पूर्ण असण्याचा निकष शैक्षणिक वर्ष 2027-28 पासून लागू होईल. बालवाटिका-2 अथवा ज्युनिअर के.जी.साठी चार वर्षे पूर्ण असण्याचा निकष 2028-29 पासून, बालवाटिका-3 अथवा सिनिअर के.जी.साठी पाच वर्षे पूर्ण असण्याचा निकष 2029-30 पासून, तर इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी सहा वर्षे पूर्ण असण्याचा निकष 2030-31 पासून लागू होईल.

वेगवेगळ्या शाळांमधील वयोमर्यादेतील फरक दूर होणार

राज्यात राज्य मंडळासह सीबीएसई, आयसीएसई आणि आयबी अभ्यासक्रमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी वेगवेगळ्या तारखांनुसार वयोमर्यादा ग्राह्य धरली जात होती. तसेच, पूर्व-प्राथमिक वर्गांच्या प्रवेशासाठी निश्चित वयोमर्यादेचा निकष नव्हता. त्यामुळे पालकांमध्ये संभ्रम निर्माण होत होता. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील तरतुदी आणि केंद्र शासनाच्या सूचनांनुसार राज्य सरकारने आता प्रवेशाचे वय निश्चित केले आहे. यामुळे शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादेत एकसमानता आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

सध्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नियम लागू होणार का?

नव्या निर्णयामुळे सध्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर परिणाम होणार नाही. शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये नर्सरी ते इयत्ता पहिलीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हे नवीन निकष लागू होणार नाहीत. तसेच, कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतून मागील वर्ग उत्तीर्ण झालेल्या नियमित विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देताना नव्या वयोमर्यादेची अट लागू होणार नाही.

वयात 15 दिवसांची सूट मिळणार

नर्सरी ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी शाळाप्रमुखांना किमान आणि कमाल वयोमर्यादेत 15 दिवसांची सूट देण्याची तरतूद करण्यात आली आहे. पायाभूत वर्गांतील नामांकन तसेच पूर्व-प्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील सूचनांचे पालन करावे लागणार आहे. नवीन वयोमर्यादेनुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी आवश्यक सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वे शिक्षण संचालक (प्राथमिक), प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांच्याकडून जारी करण्यात येणार आहेत.

School Age GR

follow us