रोहित पाटलांच्या कार्यकर्त्यांवर झाला गुन्हा दाखल; दिवाळी फराळातून पैशांची पाकिटं वाटल्याचा आरोप

  • Written By: Published:
रोहित पाटलांच्या कार्यकर्त्यांवर झाला गुन्हा दाखल; दिवाळी फराळातून पैशांची पाकिटं वाटल्याचा आरोप

Tasgaon Kavthe Mahakal Assembly Election 2024 : तासगाव शहरात रोहित पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना पैसे आणि दिवाळीचा फराळ वाटल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार संजय काका पाटलांच्या कार्यकर्त्यांनी केला होता. याप्रकरणी आता निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त भरारी पथकाने कारवाई केली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या दोन कार्यकर्ते सचिन उर्फ बाबजी गणपतराव पाटील आणि बाबासाहेब उर्फ खंडू निवृत्ती कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मतदारांना रोख रक्कम

मिळालेल्या माहितीनुसार, काल रविवार सायंकाळी तासगाव येथील साठे नगर भागात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित आर. आर. पाटील यांची पदयात्रा सुरू होती. या पदयात्रेच्या पाठीमागे सचिन उर्फ बाबजी गणपतराव पाटील (48 वर्षे), तासगाव आणि बाबासाहेब उर्फ खंडू निवृत्ती कदम (35 वर्षे) तासगाव हे काही घरांमध्ये ये जा करत होते. पदयात्रा पाण्यासाठी गेलेले आणि घटनेचे साक्षीदार राजेंद्र उर्फ गणेश मोहन चव्हाण राहणार यांना संशय आल्याने त्यांनी खात्री केली असता मतदारांना रोख रक्कम व वस्तू वाटप होत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यांनी काही सहकार्‍यांना त्या ठिकाणी बोलावून घेतलं.

Video: जरांगे पाटील यांची मोठी घोषणा; निवडणूक न लढवण्याचा निर्णय, सर्वांना अर्ज मागं घेण्याच्या सूचना

सचिन उर्फ बाबजी गणपतराव पाटील यांना विचारलं असता, त्यांनी मी शरद पवार यांची राष्ट्रवादी पार्टीचे विधानसभेचे उमेदवार रोहित पाटील यांचे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला मतदान करण्यासाठी साठेनगर तासगाव येथील मतदारांना फराळाचा एक बॉक्स आणि तीन हजार रुपयांचे पाकीट देत होतो. माझ्या खिशात अजूनही बाकीचे आहेत असे सांगून पाकिटे दाखवली. भरारी पथकाला फोन आल्यानंतर भरारी पथकाने साठे नगर येथे जाऊन चौकशी केली त्यावेळी सर्वजण पोलीस स्टेशन तासगाव येथे गेले असल्याचं समजलं. भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी याबाबत सक्षम अधिकाऱ्याचा परवाना आहे काय? असं विचारलं असता त्यांनी असा कोणताही परवाना काढला नाही असं सांगितलं. भरारी पथकाने झडती घेतली असता त्याच्याकडे पांढऱ्या रंगाचे 16 पाकिटे त्यामध्ये प्रत्येकी तीन हजार रुपये पाचशे रुपयांच्या 111 नोटा आणि पाच हजार रुपये रोख अशी एकूण 1 लाख 8 हजार 500 रुपये इतकी रक्कम आढळून आली.

कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

यावेळी एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला. याप्रकरणी दोघांची चौकशी केली असता शरद पवार यांची राष्ट्रवादी पार्टीचे विधानसभेचे उमेदवार रोहित पाटील यांचे तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हाला मतदान करण्यासाठी साठेनगर येथील मतदारांना फराळाचा एक बॉक्स आणि तीन हजार रुपयांचे आमिष दाखवून तो फराळाचा बॉक्स आणि तीन हजार रुपये असलेली पाकिटे देत असताना मिळून आल्याने त्यांना आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे. तासगाव पोलिसांनी पूर्ण चौकशी व तपास करून फिर्याद दाखल करून घेतली. दरम्यान पैसे वाटणाऱ्या दोघांना पोलीस स्टेशन येथे आल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी जमा झाले होते.

छातीत दुखण्याचा त्रास सुरू

विधानसभेचे उमेदवार संजयकाका पाटील यांनीही पोलीस स्टेशनमध्ये येऊन पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पैसे वाटताना सापडलेला सचिन उर्फ बाबजी गणपतराव पाटील याला चौकशी सुरू असताना छातीत दुखण्याचा त्रास सुरू झाल्याने त्याला तासगाव येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी हलविण्यात आले. दवाखान्यात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. रात्री उशिरा फिर्याद घेऊन गुन्हा नोंद करण्यात आला. सचिन पाटील व खंडू कदम या दोघांना आज सकाळी 11 वाजता हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube