महावितरणचे अधिकारी, कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर, कर्मचाऱ्यांना कारवाईचा इशारा
मुंबई : महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. खासगीकरणाला विरोध करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिलीय. अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांच्या 30 संघटनांनी हा संप पुकारलाय.
तीन दिवसीय राज्यव्यापी संपामुळं राज्यातील भागांत तांत्रिक बिघाड झाल्यास, मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. यातच संप करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांना राज्य सरकराने आता नोटीस बजावली आहे.
संपात सहभागी होणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांवर मेस्मांतर्गत कारवाई करण्याच्या इशारा सरकारने दिला आहे. आज मध्यरात्री 12 वाजल्यापासून महावितरण, महानिर्मिती या कंपन्यांच अधिकारी आणि कर्मचारी तीन दिवसांच्या संपावर गेले आहेत. याच संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकराने या सर्व संघटनांना नोटीस दिली आहे.
यात त्यांनी मेस्मा लावणार असल्याचं सांगितलंय. या अत्यावश्यक सुविधेत अडचण निर्माण करून वीज कर्मचारी संपावर जात असतील तर त्यांच्यावर मेस्मांतर्गत कारवाई केली जाणार आहे. त्यामुळं वीज कर्मचाऱ्यांनी संपावर जाऊ नये, अशी विनंतीही राज्य सरकारकडून करण्यात आलीय. मात्र कर्मचाऱ्यांनी मेस्मा कायद्याचं उल्लंघन केलं, तर मग यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणारय.