आयुर्वेदिक कॅप्सूलमध्ये आढळले Tadalafil आणि Paracetamol; नागपूरमध्ये FDA ची मोठी कारवाई

चायमोरल फोर्ट या नामांकित औषधाचे बनावट औषध आणि कामराज कॅप्सूल या आयुर्वेदिक उत्पादनात धोकादायक ऍलोपॅथिक घटक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 24

Major FDA crackdown in Nagpur : राज्यात बनावट आणि भेसळयुक्त औषधांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. नागपूरमध्ये बनावट ऍलोपॅथिक आणि आयुर्वेदिक औषधांच्या आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. चायमोरल फोर्ट या नामांकित औषधाचे बनावट औषध आणि कामराज कॅप्सूल या आयुर्वेदिक उत्पादनात धोकादायक ऍलोपॅथिक घटक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अन्न व औषध प्रशासनाच्या नागपूर विभागाला चायमोरल फोर्ट या औषधाची बनावट विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर विविध घाऊक आणि किरकोळ औषध विक्रेत्यांवर तपासणी मोहीम राबवण्यात आली. नमुने तपासणीसाठी मुंबईतील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. प्रयोगशाळेच्या अहवालात या औषधातील महत्वाचे एन्झाइम घटक निर्धारित मानकांपेक्षा अत्यंत कमी असल्याचे समोर आले. त्यानंतर संबंधित उत्पादक कंपनीकडून चौकशी करण्यात आली असता हे औषध त्यांच्या कंपनीने तयार केलेले नसून ते पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट झाले.

गणपतीपुळेच्या समुद्रात संभाजीनगरचे 8 पर्यटक बुडाले, तिघांना वाचण्यात यश तर 5 जण अद्याप बेपत्ता

या तपासात नागपूरसह मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील औषध विक्रेते व पुरवठादारांची आंतरराज्यीय साखळी उघडकीस आली आहे. या प्रकरणी १२ व्यक्ती आणि संस्थांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार नागपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कामराज कॅप्सूल या आयुर्वेदिक उत्पादनाच्या तपासणीत देखील धक्कादायक बाब समोर आली आहे. या उत्पादनात लेबलवर कोणतीही माहिती न देता टाडालाफिल आणि पॅरासिटामोल हे ऍलोपॅथिक घटक मिसळल्याने प्रयोगशाळेच्या अहवालातून निष्पन्न झाले आहे.

परभणी जिल्ह्यात मोठी दुर्घटना, यशवाडीत हनुमान मंदिराचा सभामंडप कोसळला; 6 भाविकांचा मृत्यू, 40 लोक दबले

आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करू शकणाऱ्या या उत्पादनाच्या पुरवठा साखळीचा माग काढताना नागपूर, पंजाब आणि उत्तर प्रदेशमधील काही संस्थांचा सहभाग समोर आला आहे. या प्रकरणी देखील गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले की, बनावट, भेसळयुक्त आणि निकृष्ठ दर्जाच्या औषधांविरोधात अन्न व औषध प्रशासन शून्य सहनशीलतेची धोरण अवलंबत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई सुरूच राहील.

बनावट औषधांच्या या दोन मोठ्या प्रकरणांमुळे औषध विक्री व्यवस्थेतील गैरप्रकार पुन्हा एकदा समोर आले आहेत. तपासाच्या निष्कर्षांनुसार संबंधितांवर औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा १९४० आणि भारतीय न्याय संहिता अंतर्गत पुढील न्यायालयीन कारवाई केली जाणार आहे.

follow us