Manoj Jarange Factor : जरांगे फॅक्टर गेला कुठं?, लोकसभेला चालला, विधानसभेत काय झालं?

  • Written By: Published:
Manoj Jarange Factor : जरांगे फॅक्टर गेला कुठं?, लोकसभेला चालला, विधानसभेत काय झालं?

Marathwada Assembly Election Results 2024 : विधानसभा निवडणुकांचे निकाल स्पष्ट झाले आहेत. भाजपच्या नेतृत्वात लढलेल्या महायुतीला स्पष्टपणे बहुमत मिळालं आहे. या निकालांची कारणमीमांसा तर होत राहीलच, पण निवडणुकांपूर्वी ज्याची प्रचंड चर्चा झाली, त्या ‘जरांगे फॅक्टर’चं या निवडणुकीत नेमकं काय झालं? हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानं महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं होतं. कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अगदी मुंबईपर्यंत जरांगे जाऊन आले. प्रामुख्यानं मराठवाड्यात प्रभाव असलेल्या जरांगेंची भूमिका विधानसभेत अत्यंत महत्त्वाची असणार असं सांगितलं जात होतं. पण निकाल पाहता खरंच तसं काही घडलं का? असा प्रश्न निर्माण होतो. विधानसभेला जरांगे फॅक्टर चाललाच नाही, अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. राजकीय अभ्यासकांनीही अगदी स्पष्टपणे तेच सांगितलं आहे. पण त्याची कारणं शोधल्यास त्यातून अनेक पैलू समोर येतात.

मनोज जरांगे यांची भूमिका, ओबीसी-मराठा समाजाच्या मतांचं झालेलं ध्रुवीकरण आणि महिलांची भूमिका या सगळ्यामुळं जरांगेंचा लोकसभेसारखा परिणाम पाहायला मिळाला नाही, असं अभ्यासकांचं मत आहे. लोकसभेचे निकाल पाहता सत्ताधारी मराठवाड्यातील सर्वच 8 जागांवर जरांगेंच्या आंदोलनाचा आणि भूमिकेचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं होतं. पण विधानसभेत तसं काहीही घडलेलं नाही.

जरांगेंची भूमिका?

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनोज जरांगे यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत बरीच चर्चा झाली. मनोज जरांगे यांनी दलित, मुस्लीम आणि मराठा अशी मोट बांधण्याचा प्रयत्न केल्याचंही पाहायला मिळालं. विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेत निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी समीकरण बांधायला सुरुवात केली. सत्तेत असल्याशिवाय आरक्षणाच्या मुद्द्याचा निकाल लावता येणार नाही, अशी त्यामागची भूमिका होती. त्यानंतर जरांगे यांनी शक्ती असेल त्याच मतदारसंघात निवडणूक लढवायची असा निर्णयही घेतला होता. त्यासाठी काही मतदारसंघात स्वतः जात जरांगेंनी आढावा घेतला होता. अनेक ठिकाणी उमेदवारांना तयारी करण्यास सांगण्यात आलं होतं.

मराठा समाजातील अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. पण ऐनवेळी जरांगे यांनी आपल्याला राजकारणात पडायचं नाही. शक्ती नसेल तर निवडणूक लढवण्यात अर्थ नाही, असं म्हणत माघार घेतली. अर्ज भरलेल्या उमेदवारांना अर्ज मागं घेण्यास सांगण्यात आलं. ‘गुपचूप जायचं आणि पाडून यायचं’ असं म्हणत कुणाला निवडून आणायचं आणि कुणाला पाडायचं हे मराठा समाजाला चांगलंच माहिती असल्याचं जरांगेंनी सांगितलं होतं.

ओबीसी मतांचं काय झालं

जरांगेनी घेतलेल्या भूमिकेनंतर लोकसभेप्रमाणं विधानसभा निवडणुकीतही त्यांचा काही जागांवर प्रभाव पाहायला मिळणार अशी सगळ्यांना आशा होती. पण आज समोर आलेल्या निकालांनंतर असं काहीही झालं नसल्याचं समोर आलं आहे. याबाबत अनेक विश्लेषकांनी जरांगे फॅक्टर जराही चालला नसल्याचं सांगितलं. जरांगेंनी विरोधकांनाच शक्ती दिल्याचं, मतदारांच्या लक्षात आलं. त्यात त्यांनी फक्त देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. त्याचा फटका बसल्याचंही सध्या बोललं जातय.

मराठवाड्यात जरांगेंच्या आंदोलनानंतर मराठा आणि ओबीसी समाजात असलेले संबंध ताणल्याचं दिसत आहे. त्यामुळं ओबीसी एकवटले. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी ठिक होती. पण ओबीसीतून आरक्षण मागितल्यावर सगळे ओबीसी अलर्ट झाले आणि महायुतीच्या बाजूनं एकवटले असं दिसतंय. सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील प्रचार विरोधकांसाठीच नकारात्मक ठरला. या उलट्या प्रभावामुळं मराठवाड्यात तर महायुतीचे जे उमेदवार निवडून येण्याची शक्यताच नव्हती तेही निवडून आल्याचं पाहायला मिळालं, असंही एकंदरीत सध्याच चित्र आहे.

भूमिकेबाबत अस्पष्टता

मनोज जरांगेंनी समाजातील लोकांना स्पष्टपणे काय करायचं असा संदेश दिला नाही, त्यामुळं काय करायचं हेच स्पष्ट नव्हतं. जरांगेंनी निवडणुकीत कुणाला पडायचं? असा निर्णय घेतला त्याचाही त्यांना फटका बसला. कारण, निवडणूक लढायची नाही, असं म्हटलं असताना कुणाला मत द्या हेही त्यांनी सांगितलं नाही. उलट फक्त पाडा असं सांगितलं. मात्र, उमेदवार पाडा म्हणजे विरोधकांना म्हणजेच महाविकास आघाडीला बळ द्या, असं त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगण्याचा प्रयत्न केला. तसं असलं तरी, विरोधकांनी तरी मराठा आरक्षणाबाबत लेखी आश्वासन कुठं दिलं होतं, याचाही विचार मतदारांनी केला असणार? असंही या निकालातून स्पष्ट होत आहे.

महायुती

“50 टक्के महिला मतदार अशी सुरक्षित मतपेढी महायुतीकडं होती. या महिलांपैकी हिंदु आणि ओबीसी महिलांची ध्रुवीकरणामुळं मिळणारी मतं आणि मराठा उमेदवार असल्यामुळं मिळणारी मतं यामुळं उमेदवाराचा विजय पक्का होतो, अशी भाजपची गणितं जुळून आली आहेत. महिलांचं मतदान मोठ्या प्रमाणात महायुतीकडं गेलं. महिला पुरुषांचं ऐकून मतदान करतात त्या समजाला या निवडणुकीत छेद मिळाला. त्यांनी ते का केलं हा विषयच वेगळा आहे, पण त्यांनी तसा निर्णय घेतला असल्याचं यामध्ये दिसतय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube