छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अन् इंदापूर येथे बंधक केलेल्या ४१ मजुरांची सुटका

Workers in Chhatrapati Sambhajinagar District : इंदापूर तालुक्यातील रेडा येथे कामाच्या ठिकाणी बंधक करून ठेवण्यात आलेल्या २२ मजूर आणि १९ बालकांसह ४१ जणांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी (District ) मजुरांच्या नातेवाइकांनी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.
छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी तत्काळ पुण्याचे जिल्हाधिकारी व कामगार कल्याण मंडळाच्या उपायुक्तांना पत्रव्यवहार करीत कार्यवाहीची विनंती केली. त्यावर वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या सूचनांवरून इंदापूरचे तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांनी संबंधित कामगारांना बंधमुक्त करीत पोलीस ठाण्यात हजर केलं. त्यावरून मुकादामासह ट्रॅक्टर मालकांवर गुन्हा दाखल केला.
मोठी बातमी! डॉ. पंकज आशिया अहिल्यानगरचे नवे जिल्हाधिकारी, राज्यातील आठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या
संदीप ताराचंद ठाकरे व इतर (रा. कन्नड, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी २५ मार्च रोजी ही तक्रार केली होती. त्यानुसार त्यांच्या परिवारातील व्यक्ती हे ऊसतोडीच्या कामासाठी १६ ऑक्टोबर २०२४ पासून मुकादम रघुनाथ धनाजी सोनवणे व इंदापूर तालुक्यातील ट्रॅक्टर मालक यांच्यासोबत इंदापूर तालुक्यात गेले होते.
मुकादम रघुनाथ सोनवणे व ट्रॅक्टर मालक यांनी कामावर जाण्याअगोदर सर्व मजुरांना एकत्रित ११ कोयते (२२ मजूर) मिळून १२ लाख रुपये उचल दिलेली होती. आजपर्यंत कामावर ६ महिने होत आले आहेत. परंतु, त्यांना आतापर्यंत केलेल्या कामाचा हिशेब करून कोणत्याही प्रकारचा मोबदला ट्रॅक्टर मालकाकडून देण्यात आलेला नाही.
सर्व लोकांना अन्नधान्याचा पुरवठा करीत नाही व जनावरांना सुद्धा चाऱ्याची सोय करून देत नसल्याने एका गायीचा मृत्यू झाला आहे. ट्रॅक्टर मालक मजुरांकडून ८ लाख रुपयांची मागणी करत असून, पैसे न दिल्यास त्यांना जिवे मारण्याची धमकी देत आहेत. यामध्ये ११ कोयते (२२ मजूर) व १९ लहान मुले, असे एकूण ४१ लोक यामध्ये फसले आहेत. या लोकांना ट्रॅक्टर मालक यांच्याकडून सोडवून द्यावे, तसंच, मुकादम रघुनाथ सोनवणे व ट्रॅक्टर मालक यांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करावी, असं तक्रारीत म्हटलं होतं.
यामध्ये विष्णू नारायण गायकवाड (वय ३१, व्यवसाय मजुरी, रा. नेवपूर, ता. कन्नड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ११ फेब्रुवारी २५ ते २६ मार्च २०२५ च्या दरम्यान नजर कैदेत ठेवणं, काठीने पायावर, महिलांना मारहाण करणं म्हणून झालेल्या त्रासाबद्दल व मारहाणीबाबत रघुनाथ धनाजी सोनवणे, संजय पांडुरंग देवकर, विकास संजय देवकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.