राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या तोफखान्यांत बीडचे दोघे

NCP: राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाने जाहीर केलेल्या दहा प्रवक्त्यांच्या यादीत बीडमधील महेबुब शेख आणि अॅड. हेमा पिंपळे या दोघांना स्थान.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
NCP

बीड : राजकारणात बीड जिल्ह्याचे स्थान नेहमीच वेगळे आणि केंद्रस्थानी राहिले आहे. अनेकदा मोठ्या राजकीय घडामोडींचे केंद्र बनलेला ह्या जिल्ह्यातील नेते कायम विविध पक्षांच्या नेत्यांच्या पहिल्या यादीत स्थान टिकवून असतात. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाने जाहीर केलेल्या दहा प्रवक्त्यांच्या यादीत बीड जिल्ह्यातील महेबुब शेख (Mahebub Shaikh) आणि अॅड. हेमा पिंपळे (Hema Pimple) या दोघांना स्थान मिळाले आहे. दोघेही वक्तृत्वात माहिर समजले जातात. राज्यातील १० जणांत बीडच्या दोघांचा समावेश असल्याने बीड कायमच पुढे असल्याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने राज्यभरात आपली स्वतंत्र राजकीय भूमिका आणि संघटनात्मक ताकद उभी करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पक्षाची भूमिका आक्रमकपणे मांडण्यासाठी जितेंद्र आव्हाड, क्लाईड क्रास्टो, भीमराव हत्तीअंबीरे, अनिश गवांदे, अॅड. फैजल मिर्झा, प्रविण कुंटे, प्रशांत वीरकर, डॉ. चंद्रकांत बरेला यासह जिल्ह्यातील महेबुब शेख व अॅड. हेमा पिंपळे यांचा समावेश आहे.

राज्यभरातून निवडक दहा जणांवर पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी सोपविली जात असताना त्यापैकी दोन चेहरे बीड जिल्ह्यातील असणे ही निश्चितच लक्षवेधी बाब आहे. बीडला राज्याच्या राजकारणात मिळणारे महत्त्व पाहता ही निवड अनपेक्षित नसली, तरी तिचे राजकीय संकेत मात्र महत्त्वाचे आहेत. अॅड. महेबुब शेख सुरुवातीला जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विद्यार्थी आघाडीत व नंतर युवक आघाडीत सक्रीय होते. पुढे आमदार सुरेश धस यांनी राजकीय भूमिका बदलल्यानंतर महेबुब शेख यांनी आपली राष्ट्रवादीची भूमिका कायम ठेवली. त्यानंतर त्यांना पक्षाने राज्यपातळीवर कामाची संधी दिली. त्यांनी राज्यभर युवकांचे मोठे संघटनही उभारले. युवकांच्या विविध प्रश्‍नांवर त्यांची कायम आंदोलने असतात. यापूर्वीही त्यांनी पक्षाचे प्रवक्ते म्हणून छाप पाडलेली आहे. आता पुन्हा पक्षाने त्यांना या पदावर संधी दिली आहे. तर, हेमा पिंपळे या चळवळीतील कार्यकर्त्या मानल्या जातात. महिलांच्या प्रश्‍नावर कायम आक्रमक भूमिका घेणाऱ्या हेमा पिंपळे वकिल असून त्यांची राजकीय सुरुवात शिवसेनेतून झालेली आहे. मागच्या काही वर्षांपासून त्या राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सक्रीय आहेत. यापूर्वीही त्यांनी पक्षसंघटनेत राज्यपातळीवर तसेच पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून काम केलेले आहे. मुद्देसुद आणि अभ्यासपूर्ण विषयांच्या मांडणीत या दोघांचाही हातखंडा आहे.

बीड जिल्हा हा केवळ निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा जिल्हा नाही, तर राज्यातील विविध राजकीय समीकरणांवर प्रभाव टाकणारा जिल्हा म्हणून त्याची ओळख आहे. त्यामुळे पक्षाच्या अधिकृत भूमिकेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रवक्त्यांच्या टीममध्ये बीडला दोन जागा मिळणे, पक्षाच्या दृष्टीनेही जिल्ह्याचे महत्त्व अधोरेखित करणारे ठरते. प्रवक्त्यांची नियुक्ती ही केवळ संघटनात्मक बाब नसते. पक्ष कोणत्या चेहऱ्यांना राज्याच्या राजकीय चर्चेत पुढे आणू इच्छितो, याचा त्यातून संकेत मिळतो. त्यामुळे दहा जणांच्या यादीत बीडच्या दोन नेत्यांचा समावेश हा शरद पवारांच्या पक्षासाठीही राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा संदेश मानला जात आहे.

बीडमध्ये पक्षाची भूमिका अधिक प्रभावीपणे मांडणे, स्थानिक प्रश्नांना राज्याच्या राजकीय चर्चेत स्थान मिळवून देणे आणि विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देणे, अशी अनेक आव्हाने या दोन्ही प्रवक्त्यांसमोर असतील.

follow us