महागाईचा आणखी एक झटका; 11ऑगस्टपासून दूध दरवाढ, दुग्धजन्य पदार्थही 10 टक्क्यांपर्यंत महागणार
गायीच्या दुधाचा विक्री दर प्रतिलिटर 60 रुपयांवरून 62 रुपये होणार असून म्हशीच्या दुधाचा दर 76 रुपयांवरून 78 रुपये करण्यात येणार आहे.
Milk price hike from August 11 : डिझेल, साखर, पॅकिंग साहित्य आणि दूध खरेदीच्या वाढत्या खर्चामुळे राज्यातील दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिकांनी दूधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून येत्या 11 ऑगस्टपासून गायी आणि म्हशीच्या दूधाच्या विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ लागू होणार आहे. याशिवाय विविध दुग्धजन्य पदार्थांच्या दरातही 10 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात येणार आहे.
नवीन दरानुसार गायीच्या दुधाचा विक्री दर प्रतिलिटर 60 रुपयांवरून 62 रुपये होणार असून म्हशीच्या दुधाचा दर 76 रुपयांवरून 78 रुपये करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या मासिक खर्चात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीत होणारी वाढही ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार टाकणार आहे.
राज्यातील सहकारी आणि खासगी डेअऱ्यांची शिखर संस्था असलेल्या दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या सभासदांची बैठक पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित अर्थात कात्रज डेअरी येथे पार पडली. संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत दूध व्यवसायासमोरील आर्थिक अडचणींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. उत्पादन खर्च सातत्याने वाढत असल्याने दूध विक्री दरात वाढ करणे अपरिहार्य असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.
मुख्यमंत्री साहेब.. मला मदत करा, मी तीन वर्षांपासून…, ऋषभ पंतच्या सोशल मीडिया पोस्टने खळबळ
संघाच्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांत डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे 10 रुपयांची वाढ झाली आहे. साखरेचे दर प्रतिकिलो सुमारे 12 रुपयांनी वाढले असून पॅकिंग साहित्याच्या खर्चात 30 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्याचबरोबर दूध उत्पादकांकडून दूध खरेदी करण्याचे दरही वाढले आहेत. परिणामी उत्पादन, प्रक्रिया, पॅकिंग आणि वाहतूक या सर्व घटकांचा एकत्रित खर्च वाढून दूध व्यवसायावर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला आहे.
दूध उत्पादकांना त्यांच्या दुधाचा योग्य मोबदला मिळावा आणि वाढलेल्या खर्चाचा ताळमेळ साधता यावा, यासाठी ही दरवाढ आवश्यक असल्याचे संघाने स्पष्ट केले आहे. उत्पादन साखळीतील वाढत्या खर्चामुळे दरवाढीशिवाय पर्याय नसल्याचेही बैठकीत नमूद करण्यात आले. या बैठकीला राज्यातील प्रमुख सहकारी आणि खासगी दूध संघांचे सुमारे 20 प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अरुण सिताराम चांभारे यांचा संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच अॅनालॉग पनीरवरील बंदीच्या प्रक्रियेत महत्त्वाचे सहकार्य केल्याबद्दल आमदार विक्रम पाचपुते यांचेही विशेष आभार मानण्यात आले.