बंगालच्या निवडणुका मोदींसाठी ठोंग्यातली झालमुडी अन् महाराष्ट्रातील भेळ; फरक नेमका काय?
Jhalmuri Vs Bhel बंगालमध्ये मोदींनी रस्त्याकडेची 'झालमुडी' खाल्ल्याचे व्हिज्युअल्स सध्या तुफान व्हायरल होत आहेत.
West Bangal Jhalmuri Vs Maharashtra Bhel : नेत्याचं बोलणं भाषणातून समजतं, पण त्याचं वागणं थेट जनतेच्या मनाला भिडतं. बंगालच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत पंतप्रधान मोदींनी रस्त्याकडेची ‘झालमुडी’ खाल्ल्याचे व्हिज्युअल्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. एरवी दिल्लीच्या दरबारी शाही भोजनात राहणारे पंतप्रधान जेव्हा कागदाच्या ठोंग्यातून झालमुडी खातात, तेव्हा त्यामागे एक मोठी ‘कल्चरल स्ट्रॅटेजी’ दडलेली असते. नेमकी ही झालमुडी बनते कशी? त्यात काय काय टाकतात आणि महाराष्ट्रात मिळणाऱ्या भेळीपेक्षा ही नेमकी कशी वेगळी असते हेच जाणून घेऊया..
भाई, हमें अपना झालमुडी खिलाओ
तर, झालं असं की, बंगालमध्ये सध्या निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून, ठिकठिकाणी प्रचारसभांचा धडाका आहे. अशाच झारग्राममधील एका सभेहून हेलिपॅडकडे जात असताना पंतप्रधान मोदींनी अचानक आपला ताफा थांबवला आणि एका साध्या झालमुडी विक्रेत्याकडे जाऊन त्यांनी “भाई, हमें अपना झालमुडी खिलाओ.” अशी विनंती केली. एवढंच नाही, तर विक्रेत्याने पैसे घेण्यास नकार दिल्यावर मोदींनी आग्रहाने त्याला पैसे दिले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, मोदींचा हा ‘डाऊन टू अर्थ’ स्वभाव लोकांच्या पसंतीस उतरत आहे.
झालमुडी बनवताना त्या विक्रेत्याने विचारलं, “साहेब, तुम्ही कांदा खाता का?” त्यावर मोदींनी हसत उत्तर दिलं, “हो, मी कांदा खातो, पण मी लोकांचं डोकं खात नाही!” त्यांच्या या मिश्किल टिप्पणीने तिथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये हास्याची लकीर उमटली. हा संवाद सोशल मीडियावर ‘मीम्स’ आणि चर्चेचा विषय ठरला आहे.
झालमुडी म्हणजे बंगालच्या अस्मितेचा ‘झाल’
आता बंगालचं हे झालमुडी प्रकरण नेमकं काय तर, झालमुडी म्हणजे बंगालचा प्राण. तिखट मसाला, कच्च्या मोहरीच्या तेलाचा झणझणीत वास आणि मुरमुऱ्यांचा कुरकुरीतपणा… बंगालमध्ये प्रत्येक स्टेशनवर, प्रत्येक नाक्यावर झालमुडी मिळते. मोदींनी हेच खाद्य निवडलं, कारण त्यांना संदेश द्यायचा होता की, ‘मी तुमच्यातलाच एक आहे’. यालाच म्हणतात ‘कल्चरल कनेक्ट’.
महिलांची अर्थव्यवस्थेत भरारी! ७६ लाख कोटी रुपयांचं कर्ज घेऊन व्यवसायात नवा प्रयोग
झालमुडी बनते कशी?
ज्या झालमुडीने मोदींना भुरळ घातली, ती बनवताना बंगालच्या मातीचा सुगंध त्यात उतरतो. मुरमुरे, बारीक चिरलेला कांदा आणि चटपटीत मसाले यासोबतच यातलं सर्वात महत्त्वाचं घटक म्हणजे झणझणीत मोहरीचं तेल. या तेलाच्या उग्र वासामुळेच झालमुडीला तो विशिष्ट ‘बंगाली तडका’ मिळतो. लिंबू आणि कोथिंबीर घालून तयार झालेली ही झालमुडी जेवढी चवीला तिखट आहे, तेवढीच ती सध्या बंगालच्या राजकारणातही चर्चेत आहे. जर तुम्हालाही झालमुडीचा खरा ‘बंगाली फिल’ हवा असेल, तर झालमुडी एका कागदाच्या ‘ठोंग्यात’ भरा आणि आस्वाद घ्या. West Bangal Jhalmuri Vs Maharashtra Bhel
झालमुडी आणि महाराष्ट्रातील भेळेत फरक काय?
झालमुडी आणि महाराष्ट्राची भेळ हे दोन्ही पदार्थ मुरमुऱ्यांपासून बनत असले, तरी त्यांची चव, बनवण्याची पद्धत आणि ‘आत्मा’ पूर्णपणे वेगळा आहे. झालमुडीचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे कच्चं मोहरीचं तेल. या तेलामुळे झालमुडीला एक विशिष्ट झणझणीतपणा आणि उग्र चव येते. यात गोड चटणी नसते. तर, महाराष्ट्राच्या भेळीचा आधार म्हणजे चिंच-गुळाची गोड चटणी आणि हिरवी तिखट चटणी. या चटण्यांमुळे भेळीला आंबट-गोड चव मिळते. या उलट झालमुडीत मुरमुऱ्यांसोबत एक प्रकारचं तिखट बंगाली फरसाण असलेला ‘चणाचूर’ आणि भाजलेली चणा डाळ वापरतात. तर भेळेमध्ये पापडी, बारीक शेव आणि चिवड्याचा जास्त वापर होतो. झालमुडी ही चवीला अतिशय तिखट आणि झणझणीत असते. मोहरीच्या तेलामुळे ती नाकात झणझण आणते. तर, महाराष्ट्रातील भेळ ही चटपटीत असते. ती खाताना गुळाचा गोडवा आणि चिंचेचा आंबटपणा जास्त जाणवतो.
बंगालची झालमुडी अन् महाराष्ट्राची भेळ तुलना कशी?
| वैशिष्ट्य | झालमुडी (पश्चिम बंगाल) | भेळ (महाराष्ट्र) |
| मुख्य चव | तिखट आणि उग्र (मोहरीचं तेल) | आंबट-गोड आणि चटपटीत |
| महत्वाचा घटक | कच्चे मोहरीचे तेल | चिंच-गुळाची चटणी |
| खास भर | ओला नारळ, उकडलेला बटाटा | बारीक शेव, पापडी |
| कसे दिले जाते? | कागदाच्या ‘ठोंग्यात’ (Thonga) | प्लेटमध्ये किंवा द्रोणात |
| प्रकार | फक्त ‘झाल’ (ओली) | सुकी भेळ आणि ओली भेळ असे दोन प्रकार |
इनसायडर’ विरुद्ध ‘आउटसायडर’ वादाला उत्तर?
तृणमूल काँग्रेस आणि ममता दीदी नेहमीच भाजप नेत्यांवर ‘बाहेरील लोक’ (Outsiders) म्हणून टीका करतात. पण जेव्हा मोदी सार्वजनिक ठिकाणी लोकांमधे मिसळून तिथलं स्थानिक अन्न आवडीने खातात, तेव्हा ते या ‘आउटसायडर’ इमेजला छेद देण्याचा प्रयत्न करतात. ‘मला तुमची भाषा समजते, मला तुमची चव माहिती आहे’, हे सांगण्याचा हा एक मूक प्रयत्न असतो. झालमुडी हे श्रीमंतांच्या ताटातलं पक्वान्न नाही, तर ते सामान्यांच्या खिशातलं स्वस्त आणि मस्त अन्न आहे. हे खाऊन मोदींनी थेट बंगालच्या ‘सर्वसामान्य’ वर्गाला (Common Man) साद घातली आहे. बंगाल निवडणुकीत उत्तर कोलकाता ते दक्षिण परगणा अशा प्रत्येक भागात या झालमुडीच्या चर्चेतून भाजप आपली मुळे घट्ट करण्याचा प्रयत्न करत आहे.
चव बंगालची, रणनीती दिल्लीची!
याआधीही मोदींनी बिहारमध्ये ‘लिटी चोखा’ खाल्ला होता किंवा दक्षिण भारतात ‘डोसा’ खाताना दिसले होते. प्रत्येक डिशमागे एक रणनीती असते. झालमुडीचा हा तिखटपणा तृणमूलच्या गोटात किती अस्वस्थता निर्माण करतो आणि मतपेटीत किती ‘गोडवा’ आणतो, हे पाहणं रंजक ठरणार आहे.