मेडिकल प्रवेशासाठी लाखोंचे डीलिंग? शंभर टक्के सिलेक्शनची गॅरंटी देणाऱ्या मोटेगावकरच्या रॅकेटचा पर्दाफाश
मेडिकल प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली तब्बल पाच लाखांपासून ते तीस लाख रुपयांपर्यंत व्यवहार केल्याचा दावा यंत्रणांकडून करण्यात आला आहे.
Motegaonkar’s racket exposed : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता अधिक गंभीर वळणावर पोहोचला आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू असून, तपास जसजसा पुढे सरकत आहे तसतसे धक्कादायक गौप्यस्फोट समोर येत आहेत. या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार मानला जाणारा आरोपी शिवराज मोटेगावकर हा अत्यंत व्यावसायिक आणि नियोजनबद्ध पद्धतीने हे जाळे चालवर असल्याची माहिती यंत्रणांच्या हाती लागली आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, लातूरमधील प्रसिद्ध आरसीसी इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून हे नेटवर्क सक्रिय करण्यात आले होते. नीट परीक्षेत यशाची हमी देत विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधला जात होता. विशेष म्हणजे पहिले काम, मग पैसे या फॉर्म्युल्यावर हे संपूर्ण रॅकेट कार्यरत होते. विद्यार्थ्यांना मेडिकल प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली तब्बल पाच लाखांपासून ते तीस लाख रुपयांपर्यंत व्यवहार केल्याचा दावा यंत्रणांकडून करण्यात आला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या रॅकेटची कार्यपद्धती अत्यंत शिताफीने आखण्यात आली होती. आरसीसीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक क्षमता आधी तपासली जायची. त्यानंतर एजंटमार्फत पालकांशी संपर्क साधून शंभर टक्के सिलेक्शनही गॅरंटी दिली जात होती. परीक्षेपूर्वी पालकांकडून केवळ टोकं मनी घेतली जायची आणि निकाल निश्चित झाल्यानंतर उर्वरित रक्कम स्वीकारली जात होती. आपल्या मुलांनी डॉक्टर व्हावे, या अपेक्षेपोटी काही डॉक्टर पालक तर या रॅकेटला थेट ब्लँक चेक देण्यास देखील तयार असल्याची धक्कादायक बाब तपासातून समोर आली आहे.
Raj Thackeray : रेल्वे स्थानकावर परप्रांतीयांना मारहाण…राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता
या संपूर्ण घोटाळ्याचा पर्दाफाश मात्र एका चुकीमुळे झाला. तपासानुसार, परीक्षेनंतर मूळ प्रश्नपत्रिका आणि आधी पुरवण्यात आलेला प्रश्नसंच यामधील प्रश्न जुळत असल्याची खात्री झाल्यानंतरच मोठी रक्कम ट्रान्स्फर केली जायची. मात्र यावेळी भौतिकशास्त्राच्या मूळ प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आणि पुरवण्यात आलेल्या संचातील प्रश्न वेगळी असल्याची तक्रार काही पालकांनी केली. याच तक्रारीनंतर तपास यंत्रणा सक्रिय झाल्या आणि या संपूर्ण रॅकेटचे धागेदोरे उलगडू लागले.
दरम्यान, या प्रकरणामुळे लातूरच्या नीट निकालांवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या 2024 च्या आकडेवारीनुसार, लातूरमधून तब्बल 24 हजार 496 विद्यार्थी नीट परीक्षेला बसले होते. त्यापैकी 1 हजार 245 विद्यार्थ्यांना 600 पेक्षा अधिक गुण मिळाले होते, तर 376 विद्यार्थ्यांनी 650 चा टप्पा पार केला होता. याशिवाय 25 विद्यार्थ्यांना 700 पेक्षा अधिक गुण मिळाले होते आणि 5 विद्यार्थ्यांनी 710 गुणांचा टप्पा देखील गाठला होता. या यशाची देशभरात चर्चा झाली होती. मात्र आता मोटेगावकरच्या कथित रॅकेटचा खुलासा झाल्यानंतर लातूरच्या गेल्या काही वर्षांतील नीट निकालांची विश्वासार्हता आणि यशाचा पाया संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याची चर्चा सुरू झाली आहे.